
जळगाव लाईव्ह न्यूज । वेगाने बदलणाऱ्या आजच्या युगात करिअरची योग्य निवड, नव्या संधी आणि भविष्यातील दिशा याबाबत विद्यार्थी व पालकांना थेट मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध करिअर समुपदेशक व उच्च शिक्षण संशोधक आनंद मापुस्कर हे प्रथमच जळगावात येत आहेत. रिफ्लेक्शन फाऊंडेशनच्या ‘पालक शाळा’ या उपक्रमाअंतर्गत ‘करिअर निवडताना’ या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ला.ना. शाळेतील गंधे सभागृहात होईल.
आनंद मापुस्कर हे राज्यातील नामांकित वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवरून सातत्याने करिअरविषयक मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ असून, त्यांना आतापर्यंत १,००० हून अधिक कार्यक्रम, परिसंवाद व मेळाव्यांचा प्रदीर्घ अनुभव लाभलेला आहे.
या मार्गदर्शन सत्रात ते करिअरची अचूक निवड कशी करावी, २१ व्या शतकातील नव्या व तंत्रज्ञानपूरक संधी कोणत्या, पारंपरिक वाटांपेक्षा वेगळ्या क्षेत्रांत करिअर कसे घडवावे, बदलते नोकरी व व्यवसायाचे स्वरूप आणि मुलांच्या करिअर निवडीत पालकांची नेमकी काय भूमिका असावी, या सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर भाष्य करणार आहेत.
आजच्या स्पर्धात्मक आणि झपाट्याने बदलणाऱ्या वातावरणात योग्य माहितीअभावी विद्यार्थी अथवा पालकांचा गोंधळ उडू नये, यासाठी एकाच छताखाली परिपूर्ण माहिती आणि भविष्यातील दिशा उपलब्ध करून देणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. सदर कार्यक्रम सर्व विद्यार्थी व पालकांसाठी पूर्णपणे मोफत असून सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रिफ्लेक्शन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८४८५८४९३३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.





