⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले ; केंद्राने महाराष्ट्र सरकारला दिल्या ‘या’ सूचना

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२२ । देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना पुन्हा परतला आहे. महाराष्ट्रातही मागील काही महिन्यापासून आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी टास्क फोर्सची आढावा बैठक घेतली.आगामी 10 दिवस राज्यासाठी फार महत्त्वाचे असतील असा इशारा या बैठकीतून देण्यात आला आहे.

10 दिवसांमध्ये सापडणारे रुग्ण आणि एकूणच परिस्थितीवरुन निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे केद्र सरकारने राज्याला पत्र पाठवले असून जिल्ह्यात टेस्टिंग, लसीकरण वाढवा, योग्य खबरदारी घ्या, अशा सूचना केंद्राचे आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास पत्राद्वारे दिल्या आहेत.

कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने केंद्रिय आरोग्य विभागाने राज्य सरकारला पत्र पाठवले असून त्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे, असे पत्रात म्हंटले आहे. या जिल्ह्यात टेस्टिंग,लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा. तसेच नवीन कोरोना व्हेरियंट यावर लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.

राज्य शासन पुढील 15 दिवस लक्ष ठेवून
काल टास्क फोर्ससोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विमध्ये त्यांनी काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील 15 दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा. मास्क वापरा, लसीकरण करून घ्या, हात धुवा व अंतर ठेवा !, असे आवाहन राज्यातील नागरीकांना केले आहे.