⁠ 
शनिवार, मे 4, 2024

तुम्हाला काय त्रास आहे? औषधी वेळेवर मिळतात का?

तुम्हाला काय त्रास होत आहे… औषधी वेळेवर मिळताहेत ना… जेवण कधी करतात? असे आस्थेवाईकपणे चौकशी करीत केंद्रीय समितीच्या सदस्य डॉ. अनुपमा बेहेरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची मने जिंकून घेतली. त्यांच्या प्रश्नांना देखील समर्पक व समाधानकारक उत्तरे देत रुग्णांनी  शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेबाबत समाधान व्यक्त केले. 

कोरोना महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. रविवारी ११ एप्रिल रोजी समिती सदस्य डॉ. अनुपमा बेहेरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट देत पाहणी केली. डॉ. बेहेरे यांनी रुग्णालय परिसरातील जनसंपर्क कक्ष येथे असलेले वॉर रूम, खाटा  व्यवस्थापन समिती व मृत्यू समन्वय समितीचे कामकाज जाणून घेतले. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांचे फोन येतात तेव्हा कसा प्रतिसाद देतात त्याची माहिती घेतली. प्रसंगी मध्यवर्ती ठिकाणी हि सोय असल्याने डॉ. बेहेरे यांनी कौतुक केले. या  समित्यांमध्ये तज्ज्ञ लोकांची असलेली नेमणूक पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच येथेच असलेले महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या कार्यालयाबाबतही माहिती घेतली. 

यानंतर जुना व १४ नंबरचा अतिदक्षता विभाग पाहिला. येथे रुग्णांचे केसपेपर अभ्यासत त्यांनी प्रकृती जाणून घेतली. रुग्णांना दिल्या जात असलेल्या उपचारांबाबत तेथील नियुक्त डॉक्टर व परिचारिकाकडून माहिती घेतली. यानंतर त्यांनी वॉर्ड क्रमांक ९ येथे जाऊन रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या औषधोपचाराविषयी जाणून घेतले.  सुविधा व्यवस्थित मिळतात का? ऑक्सिजनचा काही त्रास होतोय का? कधी जेवण करतात? उपचार व्यवस्थित आहेत ना? आदी प्रश्न विचारून डॉ. बेहेरे यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. रुग्णांनी देखील डॉक्टर व परिचारिकांच्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले. तसेच रुग्णांनी बेड साईड असिस्टंटच्या सहकार्याबद्दल देखील कौतुक केले. 

यानंतर ऑक्सिजन टॅंकबाबत पाहणी करीत माहिती जाणून घेतली. सद्यस्थितीत ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध आहे, आपल्याला ऑक्सिजनची आज कमतरता नाही अशी माहिती देण्यात आली. सी टू कक्षातदेखील डॉ. बेहेरे यांनी पाहणी करीत रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांनी वैद्यकीय सेवा उत्तम मिळत असल्याबाबत सांगून लक्ष दिले जात असल्याचे सांगितले. डॉ. बेहेरे यांनी या कक्षात देखील काही रुग्णांचे केसपेपर पाहिलेत व डॉक्टरांना सूचना करीत मार्गदर्शन केले. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यासह उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, प्रशासकीय अधिकारी डॉ. उत्तम तासखेडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, कोविड इन्चार्ज डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गणेरीवाल, जनवैद्यक औषधशास्त्र विभागाचे डॉ. योगिता बावस्कर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. संजय बनसोडे, डॉ. सतीश सुरळकर, अधिसेवीका कविता नेतकर उपस्थित होते.