जिल्हाधिकारी होते पूजेचे मानकरी; महाभोमयागही झाला संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त आज मंत्रघोषाचा जागर करीत विधिवतरित्या जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. पहाटे ४ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत यांनी श्री मंगळग्रहाच्या मूर्तीवर विशेष पंचामृत अभिषेक केला. अत्यंत सुशोभित पाळण्यात प्रतिकात्मक स्वरूप बाल श्री मंगळाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. देवाला ५६ भोग दाखविण्यात आला.
दरवर्षी प्रथेप्रमाणे श्री मंगळ जन्मोत्सवाला मंदिरावर नवे ध्वज लावले जातात. ध्वजाचे मानकरी योगेश पांडव यांनी वाजतगाजत नवे ध्वज मंदिरात आणले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, आनंद महाले, डी.ए. सोनवणे, सुनीता कुलकर्णी, उज्ज्वला शाह, आर.टी. पाटील, व्ही.व्ही. कुलकर्णी, कन्स्ट्रक्शन कन्सलटंट संजय पाटील, औरंगाबाद येथील विवेकानंद शिक्षण मंडळाचे सचिव तात्या श्रीमंत शिसोदे, संजयसिंह चव्हाण, किशोर व श्रीकांत उपाध्याय यांनी त्यांचे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वागत केले. राऊत दांपत्याने ध्वजाचे व ध्वजाचे मानकरी असलेले पांडव दांम्पत्याचे औक्षण केले. ध्वजपूजनानंतर त्यांना विधिवतरित्या कळसावर व मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आले. माजी सैनिक असलेल्या मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी ध्वजवंदन केले.
महाभोमयागाचेही आयोजन
दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत मंदिरासमोरील सभामंडपात झालेल्या महाभोमयागाचे बिल्डर सरजू गोकलानी, बिल्डर प्रशांत निकम, इंजिनिअर हेमंत पाठक (सर्व रा. अमळनेर), शेतकी संघाचे अध्यक्ष संजय पुनाजी पाटील (पिंपळे), बिल्डर महेंद्र श्रीराम पाटील (शिरूड), प्रगतिशील शेतकरी भगवान लटकन पाटील (जवखेडा), राहुल किशोर पाटील (अंतुर्ली), तापीराम दंगल पाटील (तासखेडा) व ग. स. बँकेचे अध्यक्ष उदय मधुकर पाटील (जळगाव) आदी नऊ मान्यवर सपत्नीक मानकरी होते. महाभोमयोगाच्या प्रथेस या वर्षापासूनच मंदिरात प्रारंभ झाला आहे. श्री मंगळग्रहाचा शुभांक नऊ असल्याने नऊ मानकरी निमंत्रित करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता महाआरती झाली. दिवसभर भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. वेंकीज ही आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी शुद्ध गावरान तुपातील बालूशाहीच्या प्रसादाची मानकरी होती.
मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, यतीन जोशी, मेहूल कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.