⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

५२ लाख रूपयांचा अपहाराप्रकरणी ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । बोदवड तालुक्यातील शेलवड, सुरवाडे बुद्रूक, विचवा आणि मुक्तळ या चार गावांचा कार्यभार असताना तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांनी १४ आणि १५ व्या वित्त आयोगाच्या रकमेतून ५२ लाख ९४ हजार १८० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी रविवारी बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बोदवड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रमेश सपकाळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. या गुन्ह्यात शेलवडमधील अपहारप्रकरणी माजी सरपंच देखील आरोपी आहेत.

बोदवड तालुक्यातील शेलवड, सुरवाडे बुद्रूक, विचवा व मुक्तळ या ग्रामपंचायतींमध्ये ३० डिसेंबर २०१८ ते १७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीदरम्यान तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांनी केलेल्या अनियमिततेबाबत तक्रारी आल्या होत्या. मात्र, त्याची चौकशी न झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी गटविकास अधिकारी आणि विस्तार (ग्रामपंचायत) अधिकार्‍यांना निलंबित केले होते.

बनावट दस्तऐवज केले तयार नंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रमेश सपकाळे यांनी फिर्याद दाखल केली. बोदवड तालुक्यातील शेलवड, सुरवाडे बुद्रूक, विचवा व मुक्तळ या ग्रामपंचायतींमध्ये १४व्या व १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून ५२ लाख ९४ हजार १८० हजार रुपये स्वत:च्या फायद्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय निधी परस्पर वळविण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाला.

फिर्यादीत शेलवड येथील ग्रामपंचायतीच्या अपहारात ग्रामसेवक संदीप निकमसह माजी सरपंच नीलेश माळी यांनाही जबाबदार धरण्यात आले आहे. या दोघांनी संगनमत करून स्वच्छ भारत अभियानात मृतांच्या नावे बोगस बँक अकाऊंट उघडून हा अपहार करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. शेलवडचे ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली तत्कालीन ग्रामसेवक संदीप चंद्रभान निकम आणि तत्कालीन सरपंच निलेश शांताराम माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश जाधव करत आहेत .