बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२३ । शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता १० वी, १२ वी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण होवून पुढील वर्गात शिकत आहेत, अशा माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरीता संबंधित माजी सैनिक अथवा दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नी यांनी ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत.

शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची २० डिसेंबर २०२३ पर्यंत छाननी केली जाणार आहे. प्रत्येक संवर्गातील गुणवत्तेनुसार यादी तयार करून शिष्यवृत्ती मंजूर केली जाईल. ज्या पाल्यांनी सीईटी/जेईई किंवा इतर कारणांसाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आहे. अशा पाल्यांच्या प्रकरणांसोबत गॅप प्रमाणपत्रासह (प्रतिज्ञापत्र) अर्ज सादर करावा. पदविकानंतर द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या पाल्यांचेही अर्ज स्विकारले जातील तसेच सदर अर्ज पाल्यांच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या गुणांची सरासरी काढून त्यांची शिष्यवृत्ती पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र. ०२५७ – २२४१४१४ येथे संपर्क साधावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोपान कासार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.