जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२६ । धावत्या लक्झरी बसमधून २५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेणाऱ्या चौघा सराईत आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अल्पावधीत अटक करत मोठे यश मिळविले आहे. या कारवाईदरम्यान चोरीस गेलेली संपूर्ण २५ लाख रुपयांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे ५ लाख रुपये किमतीची मारुती डिझायर कार असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा येथील नितीन पुरुषोत्तम वाणी हे जळगावातील सराफ व्यावसायिक प्रफुल्ल भागचंद सुराणा यांच्याकडे गेल्या १५ वर्षांपासून खासगी कुरिअरचे काम करतात. ११ जुलै २०२६ रोजी ते कोल्हापूर येथे चांदी खरेदीसाठी २५ लाख रुपयांची रोकड घेऊन हरे कृष्णा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने रवाना झाले होते.
प्रवासादरम्यान रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास बस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथील साई सुरुची लॉजिंग अँड रेस्टॉरंट येथे जेवणासाठी थांबली. त्यावेळी नितीन वाणी यांनी रोकड असलेली बॅग बसमध्येच ठेवून खाली उतरले. जेवण आटोपून परतल्यानंतर त्यांनी बॅग शोधली असता ती जागेवर नसल्याचे लक्षात आले. बसमधील आणि परिसरातील शोधानंतरही बॅग न मिळाल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.
घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोनू उर्फ राम भगवान सारवाण (वय ३२, रा. गुरुनानक नगर, शनिपेठ, जळगाव) याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर तीन साथीदारांची नावे सांगितली.
यानंतर शेख रहेमान शेख निसार (वय ३३, रा. पिंप्राळा हुडको), सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे (वय ३८, रा. कोल्हे नगर) आणि दशरथ सुरेश चौधरी (वय ३६, रा. खंडेराव नगर, पिंप्राळा) या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. चौघांनीही गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात शेख रहेमान याने स्वतःची मारुती डिझायर (एमएच-४७-सीयू-७८७७) ही कार गुन्हा करण्यासाठी उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण २५ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी सोनू उर्फ राम भगवान सारवाण याच्याविरुद्ध यापूर्वीही जळगाव शहर, शनिपेठ आणि भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यांत मारहाण, दरोडा, घरफोडी, चोरी तसेच शासकीय कामात अडथळा आणण्यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, संतोष पवार, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील तसेच पोलीस अंमलदार राहुल रगडे, प्रदीप सपकाळे, रवींद्र कापडणे, आणि छगन तायडे, तांत्रिक विश्लेषण विभागातील पो. अ.गौरव पाटील, मिलींद जाधव, नेत्रम विभागातील-पोअ.मुबारक देशमुख, पे. अ. पंकज खडसे, पो.अ. कुदनसिंग बयास यांच्या पथकाने पार पाडली.











