⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

वरणगावात भरवला म्हशींचा बाजार!

Varangaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात (Lumpy skin) या संसर्गजन्य आजाराने थैमान झाला असल्याने शासनाच्या आदेशाने संपूर्ण गुरांचे बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले होते. मात्र, वरणगाव येथे सोमवारी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश डावलून म्हशींचा बाजार भरवला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नियमबाह्य बाजार भरवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांची वेळीच धाव
गुरांवर मोठ्या प्रमाणात लम्पी या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे शासनाच्या वतीने आजार नियत्रंणासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे तसेच या आजारावर नियंत्रणासाठी गुरांच्या बाजारावर तसेच वाहतुकीवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी बंदी घातली आहे. या प्रकारचे आदेश संबधीत बाजार समिती, नगरपरीषद व ग्रामपंचायतीला दिले आहेत. मात्र, वरणगावातील प्रसिद्ध सोमवारचा म्हशींचा बाजार दलालांनी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश धुडकावून भरवला. जुन्या महामार्गावरील हिना पार्क येथे हा बाजार भरवण्यात आल्याची कुणकुण लागताच नगरपरीषदेच्या कर्मचार्‍यांनी धाव घेतली मात्र बाजार बंद करण्यात ते अयशस्वी ठरल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. काही वेळाने दलालांनी बाजार आटोपता घेतला.