जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२५ । उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल दि १० मार्च रोजी राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यात १३ प्रकल्पांसाठी ५६७कोटींच्या तरतुदीतून जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पाडळसरे, ‘नार-पार’साठी केलेली तरतूद भरीव नसल्याचे म्हटले जात आहे.

बोदवड सिंचन योजनेसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून १०० कोटींना निधी उपलब्ध होणार असल्याने या प्रकल्पाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्पातील संपूर्ण तरतुदींचा तपशील मिळाल्यानंतरच नेमका आकडा निश्चित सांगता येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. ‘नार-पार’ योजना साडेसात हजार कोटी रुपये खर्चाची असताना राज्य शासनाकडून केवळ ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पाडळसरे, हतनूर, भागपूर, कुन्हा वढोदा, वरणगाव, शेळगाव, अंजनी, वरखेड-लोंढे, पद्मालय, बोदवड, वाघूर सिंचन योजनांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली असताना पाडळसरे धरणाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होत आहे. तर अंजनी धरणाच्या उंची वाढीसाठी ५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.