⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024

पत्नीच्या अंगावर टाकले उकळते पाणी; शासकीय रुग्णालयात उपचार सुरु

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ ।  जळगाव शहरातील दुधफेडरेशनच्या मागील बाजूस असलेल्या राजमालतीनगरमध्ये पतीनेच पत्नीच्या अंगावर उकळते पाणी टाकल्याची धक्कादायक घटना आज रविवारी सकाळी घडली. या घटनेत फरजानाबी शेख जाबीर (वय ४२) महिला भाजल्याने तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी फरजानाबी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, राजमालतीनगरातील प्लॉट नं. ७ येथे फरजानाबी, पती जाबीर शेख, मुल अश्पाक व शोएब अशांसह वास्तव्यास आहेत. पती जाबीर सुपारी फोडण्याचे काम करतात तर फरजाना या धुणीभांडी करुन संसाराला हातभार लावतात. आज रविवार (ता.१४) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे मुलं व पतीसाठी नाष्टा व स्वयंपाकासाठी फरजाना कणीक मळत होत्या, त्याच वेळेस पती जाबीरशेख अंघोळीला जाणार असल्याने बाथरुम मध्येच बादलीत हिटर लावुन पाणी तापवण्यात येत  होते.

बादलीतील पाणी उकळल्यावर पती जाबीर याने काहीएक न बोलता  उकळत्या पाण्याची बादली उचलून फरजाना यांच्या अंगावर उलटी केली. अचानक अंगावर उकळते पाणी पडल्याने किंचाळ्या मारतच फरजाना धावत सुटल्या.  दोघा मुलांनी मदतीला धाव घेतल्यावर जाबीर यांनी दोघा मुलांना मारहाण केली. जावाई गुलाब शेख व दोघा मुलांनी जखमी फरजाना यांना जखमी अवस्थेत जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले असुन त्यांच्या जबाबावरुन पती जाबीर यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

फातेमा नगरात भांडणप्रकरणी परस्परविरुद्ध गुन्हे दाखल!

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । शहरातील फातेमा नगरात शनिवारी रात्री झालेल्या हाणामारीप्रकरणी एमआयडीसी पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटातील संशयितांना ताब्यात घेतले असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पहिल्या तक्रारीनुसार सतिष सुनील पाटील रा.इंदिरानगर यांच्या फिर्यादीवरून रेहान सालार, साजिद सालार, आमीर सालार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या तक्रारीनुसार रेहान सालार यांच्या फिर्यादीवरून ५ ते ६ अनोळखी लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

अहमदाबाद येथून मुलीला पळविणारा जळगावात जेरबंद!

0
mayur patil

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून एका मुलीला पळवून जळगावात राहत असलेल्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

लाम्सब्रीज पोलीस ठाणे अहमदाबाद येथे दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यातील तरुण पळवून आणलेल्या मुलीला घेऊन एमआयडीसी परिसरात राहत होता. लाम्सब्रीज पो.स्टे.चे सहाय्यक फौजदार अजय कुमार, हवालदार प्रभातसिंग आणि दोन महिला कर्मचारी रविवारी सकाळी एमआयडीसी पोलिसात आले होते. एमआयडीसी पो.स्टे.चे निरीक्षक प्रताप शिकारे यांची त्यांनी भेट घेतली असता उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील आणि कर्मचारी गोविंदा पाटील यांना त्यांनी पथकासह रवाना केले. पथकाने जगवानी नगर, अयोध्या नगर, एमआयडीसी परिसरासह इतर नगरात याबाबत तपास केला. दाखल गुन्ह्यातील आरोपी मयूर अशोक पाटील रा.जळगाव हा एफ-६३ शाईन मेटल्स कंपनीत राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने चौकशी करून मयूर पाटील यास पळवून आणलेल्या मुलीसह ताब्यात घेतले. दोघांना अहमदाबाद पोलिसांच्या स्वाधीन करून रवाना करण्यात आले आहे.

धक्कादायक ! पाळधीच्या युवकाची वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथील युवकाने वाढदिवसाच्या दिवशीच रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सचिन अशोक देवरे (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे.

सचिन देवरे या युवकाचा १२ मार्च रोजी वाढदिवस होता. सायंकाळी ७ वाजेपासून तो घराबाहेर गेला होता. कुटुंबीयांना वाटले की ताे त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मित्रांसाेबत गेला असेल. पण रात्री उशिर झाला तरी तो घरी का आला नाही? या चिंतेने ग्रासलेल्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. रात्री साडेबारा वाजता त्याचा मृतदेह येथील रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाजवळच्या रेल्वे रूळांजवळ आढळून आला. रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेला.

घटनेची माहिती गावात पसरताच रात्रीच घटनास्थळी गर्दी झाली होती. प्रथमदर्शी ही घटना आत्महत्या वाटत असली तरी पोलिस विविध अंगाने तपास करीत आहेत. मृत सचिन पश्चात आई-वडील असा परिवार आहे.

देवदर्शन करून घरी परतणाऱ्या पिता-पुत्रावर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू

0
accident

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । फैजपूर-भुसावळ रस्त्यावरील पिंपरूड फाट्याजवळ देवदर्शन करून मोटरसायकलवर घराकडे परतणाऱ्या पिता पुत्राचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली. गोपाळ गेंदराज पाटील (६६) ,खेमचंद गोपाळ पाटील (३३, गुरुदत्त कॉलनी) असे अपघातात ठार झालेल्या पिता पुत्राचे नावे आहेत.

याबाबत असे की, गोपाळ पाटील व त्यांचा मोठा मुलगा खेमचंद पाटील हे दोघे दर अमावस्येच्या दिवशी चिखली येथील शेतात दिवा लावणे व पूजेसाठी जायचे. त्यानुसार शनिवारी अमावस्या असल्याने दोघे सकाळीच दुचाकीने चिखली येथील शेतात गेले. तेथील पूजाविधी आटोपला. यानंतर ते दुचाकीने (एमएच १९ डीबी ५४४२)ने फैजपूरकडे परतत असताना पिंपरुड फाट्यावरील सोनम एंटरप्राइजेस जवळ आमोद्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात गोपाळ पाटील हे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा खेमचंद पाटील हा गंभीर जखमी झाला. खेमचंद पाटील यांना उपचारासाठी जळगाव येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, फौजदार रोहिदास ठोंबरे व त्यांचे सहकारी अपघात ग्रस्त ठिकाणी भेट देऊन चौकशी केली. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, अपघातात पिता-पुत्र ठार झाल्याने फैजपुरात शोककळा पसरली. खेमचंद पाटील यांच्या पश्चात आई, लहान भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. वडील आणि मुलावर सायंकाळी फैजपूर येथे अंत्यसंस्कार झाले.

जनता कर्फ्यूमुळे सुवर्णनगरीतील सुवर्ण व्यवसायाला करोडोंचा फटका

0
gold

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । जळगाव शहरात कोरोनाची रुग्ण संख्या अचानक मोठ्या प्रमाणत वाढत असतानाच वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.  मात्र जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला असून सुवर्णनगरीत १०० ते १२५ कोटींच्या सुवर्ण व्यवसायातील उलाढाल ठप्प झाली आहे. 

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. १५ मार्चला सकाळी ८ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे.

जनता कर्फ्युची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने व्यापारी बांधवांनीही करोडो रुपयांच्या उलाढालीचा विचार न करता आपली दुकाने बंद ठेवली. यात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल थांबली आहे. जळगाव शहर हे सोने व चांदी, धान्य, डाळींच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. शहरात दररोज बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात.

पुन्हा एक नवीन आश्वासन… जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू होणार!

0
jalgaon airport baithak

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । जळगाव विमानतळ सल्लागार समितीची विस्तार बैठक काल घेण्यात आली होती. यावेळी जळगाव ते पुणे विमानसेवा सुरू करण्याबाबत प्राधान्य दिले गेले असून ही सेवा नागरिकांसाठी लवकरच उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

या बैठकीला खासदार रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते. बऱ्याच काळापासून जळगाव विमानतळाच्या विकासाचा विषय प्रलंबित आहे. यासाठी विमानतळ विकास समितीची हि बैठक आयोजित करण्यात आली होती.

jalgaon airport baithak2

या विमानतळ विस्तार बैठकीला अँड.एसपी चंद्रकांत गवळी, विमानतळ संचालक सुनील मग्गीवार, स्टेशन मॅनेजर हेमचंद्र, विमानतळ विकास सल्लागार, अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह विमानतळाचे कर्मचारी उपस्थित होते.

अवकाळी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

0
raksha khadse panchnama news

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मका आणि केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही घरांचेही नुकसान झालेले आहे. या अवकाळी आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीची कोथळी येथील मानेगाव शिवारात भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी समक्ष पाहणी करून आढावा घेतला.

raksha khadse panchnama news1

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत संरक्षण देण्याची व्यवस्था अंमलात आणणे आवश्यक आहे. झालेलं नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे राज्यसरकारने व केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानाची प्राधान्याने दाखल घेणे आवश्यक असल्याचे मत रक्षा खडसे यांनी यावेळी व्यक्त केले.

raksha khadse panchnama news2

खासदारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन मदतीचे आश्वासन दिले. यावेळी देवीदास चौधरी, शंकर चौधरी, रामदास चौधरी, पंकज चौधरी, भानुदास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य उमेश राणे, अमित चौधरी, योगेश चौधरी, योगेश पाटील, मीराबाई पाटील, विजय चौधरी सर, चंद्रकांत चौधरी, श्रीकृष्ण चौधरी, अविनाश चौधरी, माधव भास्कर पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेकिंग : जळगाव शहरातील फातेमानगरात दोन गटात हाणामारी; गाेळीबार झाल्याची चर्चा

0
whatsapp image 2021 03 14 at 1.42.22 am

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । जळगाव शहरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील फातेमानगरात शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कुसुंबा व फातेमानगरातील तरुणांमध्ये वाद झाला. यात दाेन गटात तुफान हाणामारी व दगडफेक झाली. यावेळी गोळीबार झाल्याची चर्चा देखील सुरु होती परंतु याला दुजोरा मिळू शकला नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,  दुचाकी अडवल्याने कुसुंबा व फातेमानगरातील तरुणांत वाद झाला. शाब्दिक वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या वेळी तरुणांनी एकमेकांवर दगडफेक करून दुचाकींची ताेडफाेड केली. तसेच फातेमानगरातील साई प्रसाद कंपनीतदेखील ताेडफाेड करण्यात आली. या वादामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक प्रताप शिकारे, अतुल वंजारी, गाेविंदा पाटील व इतर कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी गर्दी पांगवून परिस्थती नियंत्रणात आणली. तसेच पाेलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. तर काही संशयितांचा शाेध सुरू हाेता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.