⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

वसीम रिजवीविरुद्ध मुस्लीम युवकांची गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
muslim youth demand to file a case against wasim rizvi

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । उत्तर प्रदेश येथील शिया वक्फ बॉर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी पवित्र धर्मग्रंथ कुरानच्या आयात वगळण्यात याव्यात, अशी मागणीची याचिका सर्वोच्च न्यायलयात दाखल केली असून रिजवी यांनी दाखल केलेली याचिका सर्वाच्च न्यायलयाने फेटाळुन लावावी अशी मागणी यावल येथील मुस्लीम युवकांच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान यावल शहर मुस्लीम समाज युवकांनी यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  उत्तर प्रदेश राज्यातील शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी त्यांच्या वतीने सर्वाच्च न्यायलयात एक याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, मुस्लीम पवित्र धर्मग्रंथामधील २६ आयात वगळण्यात यावी असे बोलुन ईस्लामचे पहिले तिन खलिका यांच्या विरूद्ध अनेक बिनबुडाचे आरोप लावून म्हटले आहे की पवित्र धर्मग्रंथ कुरान हे आंतकवादाची शिकवण देतो, सुरूवातीच्या मुस्लीम खलिका यांनी हा फैलाव केला असल्याचे म्हटले असून, कुराण मुळेच मुस्लीम युवक हे आंतकवादाकडे वळत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

सदरची वसीम रिजवी यांनी केलेले कुरान बाबतचे वक्तव्य हे सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सर्वत्र पसरले असुन या प्रकारामुळे देशातील मुस्लीम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे . अशा प्रकारे ईस्लाम धर्माबाबत गैरवक्तव्य व अपप्रचार करून धार्मिक भावना निर्माण करून तेढ निर्माण करण्याचा हा वसीम रिजवी यांचा खेळ असून त्यांच्या विरूद्ध भादवी कलम २९५अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.

या निवेदनावर अजहर शेख, कदीर खान नसीर खान, तौसीफ शेख नजमोद्दीन, अल्ताफ शेख समद, पप्पु बिल्डर, जावीद शेख, आसीफ शेख,  अनिल जंजाळे, नगरसेवक अस्लम शेख नबी, जहीर खान, आसिफ शेख शरीफ आणी ईमरान पहेलवान यांच्या स्वाक्षरी आहे.

जिल्ह्यामधील सर्व शाळांमध्ये ५० टक्के शिक्षकांना उपस्थितीचे निर्देश

0
jalgaon-zp-building

जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ५० टक्के शिक्षकांना उपस्थितीचे निर्देश आज १६ मार्च रोजी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भा. शि. अकलाडे यांनी दिले आहे.

मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र शिक्षकांना पूर्ण वेळ शाळेत थांबण्याची सक्ती केली जात असून ही सक्ती रद्द करावी, अथवा ही उपस्थिती ५० टक्के करावी, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. आज १६ मार्च रोजी शिक्षणाधिकारी भा. शि. अकलाडे यांनी सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ५० टक्के उपस्थिती देण्याचे निर्देश दिले आहे.

दुर्दैवी : १५ फेब्रुवारीला सरपंचपदी निवड अन् १५ मार्चला अपघाती निधन !

0
sarpanch vishal chavan dies in an accident

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । धरणगाव तालुक्यातील जांभोऱ्याचे १५ फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवडून आलेले नवनियुक्त सरपंच विशाल प्रकाश चव्हाण यांचा १५ मार्च रोजी अपघाती निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

विशाल प्रकाश चव्हाण यांना १५ तारीख शुभ ठरल्यामुळे ते १५ फेब्रुवारी रोजी जांभोरा ग्रामपंचायतींचे सरपंचपदी बिनविरोध निवडून आले आणि १५ मार्च या तारखेला रात्री ११:३५ वाजेच्या सुमारास त्यांचे अपघाती निधन झाले. असा हा विचित्र योगायोग व असा हा शुभ व अशुभ घटनांचा क्रम सर्वांना अवाक करणारा ठरला आहे.

विशाल प्रकाश चव्हाण हे चारचाकी वाहनाने पाचोरा येथे त्यांच्या भावाला घ्यायला गेले असता त्यांच्या गाडीचे खडके सिम गावाजवळ पेट्रोल संपले.  त्यामुळे ते गाडीतून बाहेर आले असता मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या (एम.एच.१८ ए. ए.५१२०) क्रमांकाच्या पीक अप गाडीने धडक दिली. त्यात विशाल प्रकाश चव्हाण यांचा करुण अंत झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ते युवा सेना उप तालुका प्रमुख म्हणुन काम पाहत होते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे जांभोरा परिसरात शिवसेनेचे मजबूत संघटन उभारण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे ते कट्टर समर्थक होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी, तीन वर्षाची एक मुलगी व नऊ महिन्यांची गर्भवती पत्नी असा परिवार आहे.

याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला पीक अप गाडी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम प्रकाश चव्हाण यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भाग ५ गु.र. नं.३९/२१ भादवी कलम ३०४(अ)२७९,३३७,३३८ मो. व्हे.ॲक्ट १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र तायडे, संदिप सातपुते व अकील मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.

आमदार राजुमामांना होती ५ नगरसेवकांची ‘चिंता’ अन् ३० नगरसेवकांची पडली ‘विकेट’!

0
suresh damu bhole bjp

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहरात जळगाव मनपात महापौरपदी प्रतिभा कापसे तर उपमहापौरपदी सुरेश सोनवणे यांना संधी देण्याचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी जवळपास निश्चित केला होता. जिल्ह्याचे नेते आ.गिरीष महाजन यांना यासाठी जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे सूचक होते. दोघांना विरोध असला तरीही त्यांनाच संधी द्यावी यामागे ते ५-६ नगरसेवक फोडू शकतात ही चिंता आ.भोळे यांना भेडसावत होती. आमदारांच्या चिंतेने घात केला आणि ३० नगरसेवक भाजपातून दुरावले.

जळगाव शहर मनपात भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतरच अंतर्गत गटबाजी सुरू झाली होती. माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी वारंवार नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना समज दिली परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अंतर्गत गटबाजीतच जिल्हाध्यक्ष तथा आ.सुरेश भोळे यांच्याविरुद्ध असलेल्या नाराजीने वेगवेगळे गट निर्माण झाले त्यातच भाजप पक्षप्रवेश करताना त्यांनी अनेकांना शब्द दिलेले असल्याने ती अडचण समोर होती.

महापौर सौ.भारती सोनवणे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना मुदतवाढ द्यावी, प्रतिभा कापसे, ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे यांना संधी द्यावी अशी चर्चा रंगू लागली होती. भाजपच्या यादीत प्रतिभा कापसे यांचे महापौरपदी तर सुरेश सोनवणे यांचे नाव आघाडीवर होते. पक्षाकडून त्यांना प्राधान्य देण्यामागे आ.राजुमामा भोळे यांना भेडसावत असलेली चिंता होती. राष्ट्रवादीतून भाजपात येताना पक्षाने त्यांना काही आश्वासने दिली होती. नगरसेवक आबा कापसे १२ नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा करीत होते. जर त्यांना संधी दिली नाही तर ते ५-६ नगरसेवक फोडू शकतात ही भीती आ.भोळे यांना होती. नेमकी हीच भिती घेऊन आ.भोळे कापसे आणि सोनवणे यांच्या नावाचा आग्रह करीत होते. आग्रह वाढत गेला तसतशी नाराजी वाढली आणि त्याच नाराजीने घात केला. भाजपच्या नवग्रह मंडळीने गेम खेळला आणि ३० नगरसेवक घेऊन त्यांनी शिवसेनेची वाट धरली.

जिल्ह्याचे नेते आमदार गिरीश महाजन यांना दोन दिवसांपूर्वी हलक्यात वाटणारी गोष्ट आज गंभीर होऊन बसली असून संकटमोचक स्वतःच संकटात सापडले आहेत. दुसरीकडे आमदार राजुमामा भोळे यांचा हट्टीपणा पक्षाला भोवणार  असून दोघांनी या घटनेतून काहीतरी धडा घ्यावा हीच माफक अपेक्षा जळगावकर व्यक्त करीत आहेत.

हे देखील वाचा : 

होय… भाजपचे ३० नगरसेवक फुटले… कुलभूषण पाटलांसह ३३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपच्या सत्ता उतार होण्याचा काळा वर्तमान

नऊग्रहांनी बदलले जळगाव मनपाचे राजकारण

आ.राजुमामा भोळेंमुळे फुटणार भाजप?

न्हावी येथे शेतमजुराची विहिरीत उडी मारून आत्महत्या

0
farmer commits suicide by jumping into a well

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । यावल तालुक्यातील न्हावी येथे एका आदिवासी शेतमजुराने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. प्यारसिंग रेमसिंग बारेला (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

न्हावी येथील शेतकरी टेनु बोरोले यांच्या न्हावी शिवारातील शेतात काल १५ मार्च रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्याच शेतात कामास असलेल्या प्यारसिंग बारेला यांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्यारसिंग बारेला याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी केले.

याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास स.पो.नि. प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. प्यारसिंग बारेला यांच्या पश्चात  पत्नी, दोन विवाहीत मुली आणि एक मुलगा आहे.

युवाशक्ती फाऊंडेशनला पुरस्कार प्रदान

0
awarded to yuvashakti foundation

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । युवाशक्ती फाऊंडेशनला कोरोना काळात सेवा बजावल्या बद्दल बारामती येथील युवाश्रम प्रतिष्ठान तर्फे रिअल हिरो कोरोना योद्धा पुरस्कार २०२१ पुरस्कार देण्यात आले. 

युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, पियुष हसवाल व प्रीतम शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारले. युवाशक्ती फाऊंडेशन ने लॉकडाऊन काळात जेवण वाटप, आरोग्य सर्वेक्षण, जिल्हा प्रशासनाला ट्रॅव्हलिंग परवान्याच्या कामात मदत, आर्सेनिक अल्बमचे वाटप, इत्यादी क्षेत्रात सेवा दिली. या कार्याला बघता सदर पुरस्कार देण्यात आले.

दुचाकी अपघातात दापोऱ्यातील तरुण ठार

0
dapora accident

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । नातेवाईकाचे लग्नकार्य आटोपुन घरी परत येत असताना दुचाकीचा अंजनी धरणाजवळ अपघात होऊन यात दापोरा येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडलीय. दीपक प्रकाश वाणी (वय-४३ रा. दापोरा ता.जि.जळगांव) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

 

दिपक प्रकाश वाणी हे सोमवारी दापोरा ता.जळगाव येथे नातेसंबंधातील लग्नाला गेले होते. लग्न आटोपल्यावर ते दुचाकीने टाकळी ता.पाचोरा येथे एरंडोल मार्गे परत जात असतांना संध्याकाळी त्यांची दुचाकी अंजनी धरणाच्या पाटात कोसळली त्यात ते जागीच ठार झाले. याबाबत एरंडोल पोलीसांना माहिती मिळताच संदीप सातपुते, अनिल पाटील, राजेश पाटील हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. 

यावेळी कासोद्याकडून परत येणारे प्रदीप हिम्मत मराठे यांनी मदतकार्य केले. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला भाऊसाहेब उर्फ अनिल प्रकाश वाणी यांनी फिर्याद दिल्यावरून अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. माञ दुचाकीचा क्रमांक समजू शकला नाही. मृत दिपक वाणी हे शेतकरी होते असे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,भाऊ,पत्नी व २मुले असा परिवार आहे. सहायक फौजदार विकास देशमुख व जुबेर खाटीक हे पुढील तपास करीत आहेत.

एरंडोल येथे कोरोना जनजागृती मोहीम व नागरिकांना मास्क वाटपाचा उपक्रम

0
erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । एरंडोल तालुका पत्रकार संघ व एरंडोल तालुका औषध विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ मार्च रोजी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी एरंडोल बस स्थानक-आगार,पंचायत समिती कार्यालय,तहसिल कार्यालय या गर्दीच्या प्रमुख कार्यालयांमध्ये जाऊन पञकार व औषध विक्रेत्यांनी विनामास्क असलेल्या नागरीक व कर्मचार्यांना गुलाबपुष्प व मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी काहीजणांकडे मास्क असुनही त्यांनी खिशात ठेवलेले आढळुन आले तर विनामास्क नागरीक व कर्मचारी मोठ्या प्रमाणात आढळुन आले. पञकार व औषध विक्रेत्यांनी या मोहीमेत मास्क वापरा,सोशल डिस्टन्सचे पालन करा असे आवाहन केले.

याशिवाय ‘नो-मास्क-नो-एन्ट्री, या योजनेची प्रभाविपणे अंमलबजावणी करावी अशी विनंती संबंधित कार्यालयांच्या प्रमुखांना केली.

प्रमुख कार्यालयांना भेटी दिल्यानंतर शहराच्या मुख्य बाजारपेठेकडे मोहीम वळविण्यात आली. बुधवार दरवाजा,छञपती शिवाजी महाराज चौक,भगवा चौक या ठिकाणी विनामास्क आढळुन आलेल्या नागरीकांना गुलाबपुष्पासह मास्क वितरीत करण्यात आले. या उपक्रमास नागरीकांकडून उत्स्फूर्त प्रतीसाद मिळाला. 

या मोहीमेत जिल्हा पञकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील,एरंडोल तालुका औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष कैलास न्याती, किशोर भक्कड, भूषण पाटील, मनोहर पाटील, महेश पाटील, पिन्टू सोनार, उदय पाटील, अजय महाजन हे औषध विक्रेते, पञकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी, उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, सुधीर शिरसाठ, दिपक बाविस्कर, कोषाध्यक्ष कमरअली सैय्यद, कैलास महाजन, शैलेश चौधरी,  प्रा.नितीन पाटील, पंकज महाजन, संजय बागड, चंद्रभान पाटील, कुंदन ठाकुर, प्रविण महाजन, मनोहर ठाकुर, रोहीदास पाटील, दिनेश चव्हाण, रतन अडकमोल, देविदास सोनवणे, अजय वाघ इत्यादी सहभागी झाले.

एरंडोल बस आगार व्यवस्थापक व्ही.एन.पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एरंडोल बसस्थानकावरील ध्वनिक्षेपकावरून ‘मास्क नाही तर एस-टी त प्रवेश नाही, अशी सुचना देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.

धक्कादायक बातमी; जामनेरातील क्वारंटाइन सेंटरमधून 15 कोरोनाबाधितांचा पोबारा

0
15 corona patients escaped from the quarantine center in jamnera

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असतानाच जामनेरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  येथील एका क्वारंटाइन सेंटरमधून 15 रुग्ण पळाल्याची खळबळ घटना समोर आली आहे. 

याबाबत माहिती कळताच क्वारंटाइन सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांची जामनेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

जामनेर येथील क्वारंटाईन सेंटरमधून कोरोननाबाधित 15 रुग्ण पळाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांअभावी रूग्ण पळाल्याची चर्चा आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होत असून, या कोविड सेंटरमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. वारंवार प्रशासनाकडे मागणी करून देखील लक्ष दिले जात नसल्याने अखेर या क्वारटाईन सेंटरमधून कोरोनाबाधित रुग्णांनी तिथून पळ काढला, असे सांगितले जात आहे. या फरार रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा तपास पोलीस करत आहेत.