जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ५० टक्के शिक्षकांना उपस्थितीचे निर्देश आज १६ मार्च रोजी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भा. शि. अकलाडे यांनी दिले आहे.
मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र शिक्षकांना पूर्ण वेळ शाळेत थांबण्याची सक्ती केली जात असून ही सक्ती रद्द करावी, अथवा ही उपस्थिती ५० टक्के करावी, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. आज १६ मार्च रोजी शिक्षणाधिकारी भा. शि. अकलाडे यांनी सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ५० टक्के उपस्थिती देण्याचे निर्देश दिले आहे.