⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

जिल्हाधिकारी ‘कोरोना’त व्यस्त… काही अधिकारी आपल्यातच ‘मस्त’

0
abhijit raut

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२१ ।  शहरासह जिल्ह्यात सध्या वाळू व्यावसायिकांनी वेगळाच ट्रेंड सुरू केलाय.. सर्वांची मिलीभगत असून ठरवून निवडक मक्ते घेण्यात आले आहे. मक्ते तर ठीक आहेत परंतु वाळू उपसा केव्हा, किती कसा करायचा याचे नियम नेहमीप्रमाणे धाब्यावर बसविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी साहेब कोरोनाचा संसर्ग रोखणे आणि उपाययोजना करण्यात व्यस्त असल्याचा फायदा वाळूमाफिया घेत आहे. दिवसाढवळ्या धावणारे भरधाव डंपर अनेकांचा बळी घेत असून कुणालाही याची पर्वा नाही. मुळात महसूल, गौण खनिज, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे हात या धुळीने माखलेले असल्याने सर्वच आलबेल आहे.

जळगावकरांना अभिजीत राऊत यांच्यासारखे तरुण आणि दूरदृष्टी असलेले जिल्हाधिकारी लाभणे हे जिल्हावासियांचे भाग्य आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा कहर वाढत असताना जिल्हाधिकारी म्हणून अभिजित राऊत यांच्याकडे पदभार आला. पहिल्या दिवसापासून त्यांनी कामाला धडाकेबाज सुरुवात केली. प्रसिद्धीपासून कायम दूर असलेला हा माणूस शांततेत सर्व कामे मार्गी लावतो परंतु एकट्याने सर्वकाही शक्य होत नाही हेही तेवढच खरं.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्ह्यात काम करीत असताना प्रत्येक बाबींवर योग्य प्रकारे लक्ष ठेवून होते. कोरोनाची पहिली लाट सरत असताना त्यांनी सर्व घटकांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली, त्याचेच फलित म्हणून जिल्ह्यात प्राप्त निधी जवळपास संपूर्ण खर्च झाला. निधीचे नियोजन झाले, वाळू गटांचे लिलाव मार्गे लागले.

जिल्हाधिकाऱ्यांचे कामकाज सुरळीत सुरू असताना कोरोनाची दुसरी लाट आली आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. जिल्हाधिकारी नियोजन करत असताना कोरोनामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये याचा ते पुरेपूर विचार करीत आहे. जिल्हा रुग्णालयात अचानक पाहणी करणे, बेडची व्यवस्था लावणे, इंजेक्शन, औषधी, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची धावपळ सुरू असताना वाळूमाफिया मात्र सुसाट सुटले आहेत.

जळगावात वाळू व्यावसायिकांनी यावर्षी नवीन पॅटर्न अंमलात आणला. एरव्ही एकमेकांचे पाय खेचणारे वाळू गटाचे लिलाव करताना एकत्र झाले. सर्वांनी संगणमत करून निवडक ठेके आपल्या पदरात पाडून घेतले. शासकीय नियमानुसार ठेके त्यांना मिळाले त्यामुळे त्यावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही हे निश्चित झाले. मक्ता जरी वाळू ठेकेदारांचा असला तरी त्यावर नियंत्रण नियंत्रण प्रशासनाचे असते. जिल्हाधिकारी नियोजनात व्यस्त असल्याने इतर विभागांनी वाळूमाफियांनीकडे ‘अर्थपूर्ण’रित्या दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.

नदीपात्रातून किती उपसा करावा, वाळू वाहतुकीची वेळ कशी असावी, एका वाहनात किती वाळूसाठा ठेवावा, वाळू उपसा कुठून करावा, वाहनांचा वेग कसा असावा यावर कोणाचे नियंत्रण राहिले नाही. रस्त्याने भरधाव जात असलेल्या डंपरमुळे रस्त्यांची दुरवस्था होते सोबत त्यामागे धुळीचे लोळ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणतात. शनिवारी एकाच दिवसात महामार्गावर डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. घटना सीसीटीव्हीत कैद झाली. आपल्या डंपरखाली चिरडून कोणाचा मृत्यू झाला हे पाहायला देखील डंपर चालकांना वेळ नाही.

वाळू ठेका, वाळू वाहतूक यावर लक्ष देण्याची जबाबदारी जेवढी महसूल प्रशासनाची आहे तेवढीच गौण खनिज विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाची देखील आहे. सध्या तिघे विभाग ‘अर्थपूर्ण’रित्या याकडे दुर्लक्ष करीत आहे. जळगावकरांसाठी वाळू वाहतूक धोकादायक ठरत असून जिल्हाधिकारी साहेबांना कोरोनाचे नियंत्रणाचे नियोजन करण्यात मग्न असू द्या पण इतर विभागांनी तरी आपली जबाबदारी ओळखून कर्तव्याला न्याय द्यावा, हीच माफक अपेक्षा आहे.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/252702649919953/

तडीपार आरोपी चोरीच्या ट्रॅक्टरसह एलसीबीच्या जाळ्यात

0
manoj bhalerao

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कारवाईकामी जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या दोन्ही तडीपार आरोपींना चोरीच्या ट्रॅक्टरसह एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

प्रविण ऊर्फ मनोज रमेश भालेराव व त्याचा साथीदार पप्पु ऊर्फ मुकेश रमेश शिरसाठ दोघे रा.पिंप्राळा हुडको बौध्द वसाहत,जळगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. चोरीच्या ट्रॅक्टरची ओळख पटू नये म्हणून त्यांनी त्याचा रंग बदलला होता.

दोघांना एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पो.हे.कॉ. सुनिल पंडीत दामोदरे, पो.हे.कॉ. जयंत भानुदास चौधरी, पो.ना. विजय शामराव पाटील, पो.कॉ. सचिन प्रकाश महाजन, पो.कॉ. पंकज रामचंद्र शिंदे यांनी शहरातील बी.जे.मार्केट परिसरातून ताब्यात घेतले असून पुढील तपासकामी जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात आज ११५९ रुग्णांची कोरोनावर मात; ११७९ नवीन रुग्ण

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्ण कमी होत नाहीये. आज देखील ११७९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या २४ तासात ११५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. दरम्यान, जळगाव शहरानंतर आता चोपडा तालुक्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. भुसावळमध्येही आज दीडशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहे.

त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ९३ हजार ६०० झाली आहे. तर आज ११५९ कोरोना रुग्ण आजारातून बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे होणार्या रुग्णांची एकूण संख्या ८० हजार ३३९ वर गेली आहे. मात्र जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेला कोरोना मृताच आकडा वाढतच आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, आज १४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृताच आकडा १६८२ वर गेला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्‍टिव्ह रूग्‍णांचा आकडा देखील वाढत आहे. ११ हजार ५७९ रुग्ण उपचार घेत आहे.

आज जळगाव शहर २४८, जळगाव तालुका २३, भुसावळ १५५, अमळनेर ५१; चोपडा २५७; पाचोरा ३६; भडगाव २९; धरणगाव ६१; यावल ५२; एरंडोल ३७, जामनेर ५५; रावेर ६८, पारोळा ३२; चाळीसगाव ०६, मुक्ताईनगर ०९; बोदवड ४९ आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे ११७९ रूग्ण आढळून आले आहेत.

जळगावकरांनी लवकरात लवकर नियमांचे पालन करून कोरोनाला अटकाव करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

आ. गिरीशभाऊ महाजन यांचा पश्‍चिम बंगालमध्ये प्रचार

0
girish mahajan (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२१ । माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन हे पश्‍चीम बंगालमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले असून आज त्यांनी बालूर घाट मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या नियोजनपर बैठकीला मार्गदर्शन केले.

माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन हे पश्‍चीम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी बालघाट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी प्रचार सभा घेतल्या. तर आज दुपारी त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची नियोजनासाठी बैठक घेतली.

याप्रसंगी आ. गिरीशभाऊ महाजन म्हणाले की, पश्‍चिम बंगालमध्ये देखील आपल्याला शत प्रतिशत भाजपा या नुसार सत्तेत यायचे आहे. यासाठी अचूक नियोजन हे खूप महत्वाचे असते. विशेष करून शेवटच्या टप्प्यात प्रचार संपल्यानंतर याच अचूक नियोजनाच्या बळावर चांगल्या मताधिक्याने विजय मिळत असतो. भारतीय जनता पक्षाने पन्ना प्रमुख या संकल्पनेच्या आधारे अतिशय सुक्ष्म असे नियोजन केलेले आहे. कार्यकर्त्यांनी या नियोजनानुसार शेवटच्या टप्प्यात नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्याचे काम करावे. अर्थात, यासाठी अंतिम टप्प्यातील नियोजन हे अतिशय महत्वाचे असल्याने सर्वांनी यानुसार काम करण्याचे आवाहन आमदार महाजन यांनी याप्रसंगी केले.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये आ. गिरीशभाऊ हे अन्य मतदारसंघातील सभांना संबोधीत करणार असून प्रचार फेर्‍यांमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच त्यांचा भर हा प्रामुख्याने नियोजनांच्या बैठकांवर राहणार आहे.

महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन जाहीर; काय सुरु काय बंद राहणार?

0
uddhav thackeray

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२१ । राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली. त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल. तो सोमवारी सकाळी संपले. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत.

काय काय बंद राहणार

राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक काय म्हणाले?

शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन लागू असेल. हा निर्णय एकमताने झालाय. निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केलीय, असं मलिक म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, जीम चालक आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांशीही चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं.

असा असेल लॉकडाऊन

  • उद्या रात्री 8 वाजेपासून नियमावली लागू
  • रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी
  • मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, डिलिव्हरी सर्व्हिस चालू
  • सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं काम करणार
  • इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही
  • बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार
  • भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्णय
  • शुटिंगवर गर्दी होणार नाही तिथे परवानगी, चित्रपटगृहे बंद राहणार
  • सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, मास्क बंधनकारक, क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

सत्ताधारी मंत्र्यांनी जिल्ह्यात दोन दिवस मुक्कामी थांबावे : डॉ.सतिष पाटील

0
satish patil

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२१ । जळगावसह राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. मात्र त्याकरीता लॉकडाऊन करून चालणार नाही. तर राज्यातील सत्‍ताधारी मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दोन दिवस मुक्‍कामी राहून प्रशासन गतिमान केल्यास परिस्‍थिती आटोक्यात येईल; असे म्‍हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. सतीष पाटील यांनी घरचा आहेर दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाबत त्यांनी माजी पालकमंत्री म्हणून चिंता व्यक्त केली. सध्या शासन करत असलेल्या उपाय योजनांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर विरोधी पक्ष या गंभीर स्थितीत काम न करता टीका करीत आहे, हे बरोबर नाही. असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

राज्यातील सत्ताधारी मंत्र्याबाबत ते म्हणाले, की पक्ष बांधणीसाठी या मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात दोन- तीन दिवस मुक्काम केला. परंतु कोरोनाची साथ वाढत असताना याच मंत्रांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसत आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊन करण्याचे सुचविले जात आहे. मात्र हा उपाय होऊ शकत नाही. सरकारने प्रशासन गतिमान करण्यासाठी मंत्र्यांना प्रत्‍येक जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पाठवून त्याठिकाणी तालुकानिहाय बैठका घेऊन आरोग्याचा आढवा घ्यावा.

धामणगाव येथील २३ वर्षीय तरुणीची आत्महत्या

0

जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना ३ एप्रिल रोजी दुपारी घडली असून दुर्गाबाई दीपक कोळी (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुर्गाबाई कोळी हिने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना ३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. दुर्गाबाई यांनी गळफास घेतल्याचे  समजताच  त्यांना तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधकिर्‍यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले.  तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास कासार हे करीत आहे.

भुसावळात टरबूजाच्या गाडीतून साडेआठ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त

0
bhusaval

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । टरबूजविक्रीच्या गाडीतून चक्क गांज्याची तस्करी करणाऱ्या तिघांच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 

नाहाटा महाविद्यालयाजवळ शनिवारी पहाटे या आरोपींच्या ताब्यातून सुमारे साडेआठ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

गांजा तस्करी करणारा मुख्य मालक पसार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. शहरात गेल्या काही वर्षात प्रथमच मोठी कारवाई झाल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेतील आरोपींमध्ये दोन सुरतच्या तर एका भुसावळातील आरोपीचा समावेश आहे.

यागांजा तस्करीप्रकरणी शब्बीर कालेखान पठाण (40, अकबर की वाडी, खोलवड, ता.कामरीज, जि.सुरत), शेख अकील शेख लतीफ (34, बापूनगर, झोपडपट्टी खोलवाडा, ता.कामरीज, जि.सुरत) व शेख शरीफ शेख (33, मुस्लीम कॉलनी, उस्मानीया मशीदजवळ, भुसावळ) या आरोपीस अटक करण्यात आली. मुख्य आरोपी हमी समशोद्दीन पतंगवाला नवीन ईदगाहच्या पाठीमागे, भुसावळ हा पसार झाला आहे.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे सहा.निरीक्षक गणेश रामदास धुमाळ, सहा.निरीक्षक अनिल छबूराव मोरे, हवालदार जिजाबराव पाटील, अयाज अली, सुनील सोनवणे, रमण सुरळकर, समाधान पाटील, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, सुभाष साबळे, ईश्‍वर भालेराव, करतारसिंग पररेशी आदींच्या पथकाने केली. तपास सुनील सोनवणे, अनिल पाटील, किशोर महाजन करीत आहेत.

विनय गोसावी यांनी घेतला कोविडच्या उपाययोजनांचा आढावा

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । एरंडोल येथील प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी कोविडच्या उपचारासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांना आढावा घेऊन संबंधीतांना आवश्यक ते निर्देश दिलेत.

एरंडोल शहरासह तालुक्यात अलीकडच्या काळात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर, येथील प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज शेख, वैद्यकीय अधीक्षक कैलास पाटील उपस्थित होते.

या बैठकीत ग्रामीण रुग्णालयात केवळ २ डॉक्टर असून कोविड सेंटर येथे ४६ रुग्ण व ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सिजन वॉर्डमध्ये २४ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांसाठी कृष्णा हॉटेलवरून उत्तम जेवण मिळत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. पालिकेचे पथक वेळोवेळी साफसफाई करत असल्याचे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, कोविड काळात ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांना देत असलेल्या सेवा व सुविधांबाबत रुग्णांच्या परिवारातील सदस्य समाधान व्यक्त करत असल्याची माहिती देण्यात आली.

प्रांताधिकारी म्हणाले की, वैद्यकीय कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्यामुळे पालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे स्वॅब घेत आहेत. सफाई कर्मचारी मृत झालेल्या रुग्णाचे अंत्यसंस्कार करत आहे. कमी कर्मचारी असतांना ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व नर्स, कर्मचारी हे दिवसरात्र परिश्रम करून रुग्णांची सेवा करत आहे.

ऑक्सिजन वॉर्डमध्ये २४ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांसाठी कृष्णा हॉटेलवरून उत्तम जेवण मिळत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. पालिकेचे पथक वेळोवेळी साफसफाई करत असल्याचे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, कोविड काळात ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांना देत असलेल्या सेवा व सुविधांबाबत रुग्णांच्या परिवारातील सदस्य समाधान व्यक्त करत आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.