⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

आ. मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना जामीन मंजूर

0
mangesh chavan

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना दोरीने बांधून ठेवल्याच्या प्रकरणात कारागृहात असलेले आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना आज जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

काय आहे प्रकरण?

आमदार चव्हाण यांच्यासह सुमारे ४० ते ५० जणांचा जमाव महावितरणच्या कार्यालयात गेला होता. यावेळी त्यांनी फारुख यांना दोरीने खुर्चीत बांधुन मारहाण केली. फारुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन चव्हाणांसह ३१ जणांना अटक केली हीती. अटकेतील सर्व संशयितांना पोलीस कोठडी तर नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी दिली. जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे आणखी ३१ जणांना ठेऊन घेणे गैरसोयीचे होणार होते. त्यामुळे आमदार चव्हाण यांच्यासह सर्व ३१ संशयितांना नाशिक कारागृहात हलवण्यात आले.न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांतर्फे एकत्र जामीन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. काल आमदार मंगेश चव्हाण यांच्या जमीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली होती. तर आज न्यायालयाने त्यांच्यासह इतर सर्वांना जामीन मंजूर केला आहे.

कोरोना नियम पाळत नसल्यामुळे जळगाव शहरात चार दुकाने सील

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । शहरात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून मनपा प्रशासनाकडून नियम मोडणाऱ्यांना धडक कारवाई केली जात आहे सोमवारी उपायुक्त संतोष वावळे यांच्यासह अधिक्रमण पथकाने शहरात फिरून चार दुकाने सील केले तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.

जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असतानाही नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. जळगाव शहर मनपाकडून धडक कारवाई केली जात असून दोन दिवसापूर्वी ५ दुकाने सील केल्यानंतर सोमवारी पुन्हा ४ दुकाने सील करण्यात आली. अतिक्रमण पथकाच्या कारवाईने काहीसा वचक निर्माण होत असला तरी नियम मोडणारे मात्र कायम आहेत.

एरंडोल येथे प्रांताधिकाऱ्यांनी केली खाजगी कोविड सेंटर व मेडिकल स्टोअरची तपासणी

0
erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । एरंडोल येथील खाजगी कोविड केअर सेंटर व मेडिकल स्टोअरची प्रांताधिकारी विनय गोसावी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख यांनी अचानक भेट देऊन तपासणी केली.

यावेळी प्रत्यक्ष कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन रुग्णांना प्रत्यक्ष भेटुन त्यांना काही समस्या आहेत का ? त्यांना बिल व मिळणारे औषध,इंजेक्शन यांच्या बाबत माहिती घेतली.तसेच या दोघ अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी मुळे रुग्णांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.यावेळी शहरातील कल्पना हॉस्पिटल,अष्टविनायक कोविड केअर सेंटर,सुयश हॉस्पिटल अशा ३ खाजगी कोविड केअर सेंटर व २ मेडिकल स्टोअर ची तपासणी दोघं अधिकाऱ्यांनी केली.

याप्रसंगी अधिकाऱ्यांना वरील कोविड केअर सेंटर व मेडिकल स्टोअर मध्ये रुग्णांचे चांगल्या प्रकारे व योग्य मोबदला घेऊन इलाज होत असल्याचे आढळुन आले.तसेच मेडिकल स्टोअर मध्ये सुद्धा योग्य मोबदला घेऊन औषधी दिल्या जात असल्याचे दिसुन आले.दरम्यान तालुक्यातील या अचानक तपासणी दौऱ्याने प्रांताधिकारी विनय गोसावी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख यांचे कौतुक होत आहे.

चोपड्यात दोन ऑक्सिजन ड्युरा टॅंक दाखल

0
chopda

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । ऑक्सिजन साठी आर्थिक मदत करा असे सामाजिक आवाहन सामाजिक कार्यकर्ते व सुकाणू समिती सदस्य एस बी पाटील यांनी चोपडेकरांना केले होते. त्याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, विविध संघटना व जनतेने सढळ हाताने मदत करून ऑक्सिजन टॅंक  खरेदीसाठी लोकवर्गणी देणे सुरू केले. एक लाखाच्या निधी जमा झाल्याने ॲडव्हान्स देऊन ते बुकिंग पक्के केले.

दरम्यान शनिवारी पूर्ण पेमेंट देणे गरजेचे असल्याने हातेड खुर्द येथील उद्योजक राहुल सोनवणे यांच्याकडून हात उसनवारीने उर्वरित रक्कम घेऊन उर्वरित रकमेचा साडेतीन लाखाचा चेक  पाठवून ऑर्डर कन्फर्म केले.

रात्री वाई – सातारा येथून कंपनीतून ड्युरा टॅंक  निघून रविवारी सकाळी  ऑक्सिजनचे दोन ड्युरा टॅंक  चोपड्यात दाखल झाले . प्रत्येक टॅंक  मध्ये 200 लिटर ऑक्सिजनची क्षमता असणार आहे . चोपडा उपजिल्हा रुग्णालयास मोठी मदत झाली असून त्याबद्दल तहसीलदार अनिल गावीत व सुकाणू समिती सदस्य एस. बी.पाटील, डॉक्टर, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व जनतेने मदत करणाऱ्या दानशूर यांचे विशेष धन्यवाद व्यक्त केले आहेत.

कोरोनाचा दुसऱ्या लाटेने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. एवढी भीषण परिस्थिती असताना उपजिल्हा रुग्णालयातील  कोविड हेल्थ सेंटर, महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर व नवीन प्रशासकीय इमारतीत उपचारासाठी दाखल असलेल्या प्रत्येक गोरगरीब  व गरजू रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना लागणाऱ्या महत्त्वाच्या ऑक्सिजन (प्राणवायू) उपलब्ध करणे, आर्थिक अडचणीमुळे जिकरीचे होत आहे. दुसरीकडे फुकट मिळणाऱ्या ऑक्सिजनची  किंमत आज आपल्याला कळत नाही परंतु मायबाप कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सीजन करिता मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करा असे आवाहन व  आर्त हाक सुकाणू समिती सदस्य एस बी पाटील यांनी चोपड्या तालुक्यातील जनतेला केले होते. त्यांच्या आवाहनाला जनतेकडून लोकवर्गणी साठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्यातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाल्याने ,दोन ऑक्सीजन टॅंक चोपडा उपजिल्हा रुग्णालय साठी दाखल झाले आहेत.

ऑक्सीजन मुळे कोरोनाचा रुग्णांची निश्चितच प्राण वाचतील,  गेल्या वर्षीपासूनच संपूर्ण राज्यात चोपडा तालुका चर्चेचा विषय ठरला आहे .कोरोनाचा महामारीत  शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड 19  रुग्णालयात रुपांतर झाले .100 बेडची व्यवस्था असलेल्या रुग्णालयात दात्याकडून बेडची उभारणी करून आज 190 रुग्ण येथे उपचार घेत आहेत तर महाविद्यालयात कोविड  केअर सेंटरला कमी लक्षणे असलेला रुग्णांसाठी 150  बेड व  नवीन प्रशासकीय इमारतीत नुकतीच शंभर बेडची उभारणी करण्यात आली आहे

कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाल्यापासून बेडची  उणीव भासू लागली त्याचा गांभीर्याने विचार करून शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस बी  पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड  हेल्थ सेंटरला ऑक्सिजन पाईपलाईन साठी आर्थिक मदत करण्याचे जनतेला वारंवार सोशल मीडियावर आवाहन केले होते त्यांच्या आवाहनाला जनतेकडून भरभरून प्रतिसाद देखील मिळाला , लोकवर्गणीतून शंभर बेडची क्षमता असताना 190 बेडची व्यवस्था करण्यात येऊन त्यापैकी 90 बेडला अत्यंत कमी खर्चात ऑक्सीजन पाइपलाइन करून छोटे एक्स-रे मशीन ,विज नसताना  दोन इन्व्हर्टर सोबत  हॉलमध्ये काँसुलेटर मशीन बसविण्यात आले आहेत तसेच जनतेला  व कोरोनाचा रुग्णांच्या सहकार्याने खाजगी पातळीवर मेडिसिन बँक उभारून इमर्जन्सीला इंजेक्शन उपलब्ध करून दिली जात आहेत ,त्यानंतर लोकवर्गणीतून महाविद्यालयातील कोविंड केअर सेंटरला कमी लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी 150 बेडची व्यवस्था करण्यात आले आहे तसेच लोकवर्गणीतून नवीन प्रशासकीय इमारतीत गंभीर कोरोना रुग्णांसाठी शंभर बेडची पुन्हा व्यवस्था करण्यात आली असून त्यापैकी पन्नास बेडला ऑक्सिजन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकवर्गणीतून शासकीय उपजिल्हा रुग्णालयात व आदी ठिकाणी एकूण चारशे पन्नास बेडची  उभारणी करण्यात आली आहे त्यापैकी 140 बेडला ऑक्सिजनची सुविधा पुरवण्यात आले आहे. लोकवर्गणीतून औषधे यांसारख्या महागडी सुविधा उपलब्ध करून चोपडा तालुक्याने आदर्श निर्माण करून महाराष्ट्रात मॉडेल बनला आहे. गेल्या वर्षभरापासून  सुविधा सुरळीत असताना शहरातील उपजिल्हा  रुग्णालयात दिनांक 27 रोजी रात्री ऑक्सिजन सिलिंडर संपल्याने कोरोनाचे पाच रुग्ण दगावल्याची घटना घडली याबाबत रुग्णाचे नातेवाईक व उपजिल्हा रुग्णालय प्रशासनामार्फत दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

कोरोनाचे  दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात जवळपास सात हजाराच्या आसपास रुग्ण एकदम वाढले आणि  ऑक्सिजनच्या तुटवडा भासत आहे. त्यात शासन वेळेवर पेमेंट करीत नसल्याने अधूनमधून ऑक्सीजन सिलेंडर संपल्याचे चित्र  देखील निर्माण होत आहे याची दखल घेत कृती समितीचे समन्वयक एस बी पाटील यांनी पुढाकार घेतला.

पाळधी बायपासला चारचाकी चक्काचूर : एअरबॅगमुळे बचावले दोघे

0

जळगाव लाईव्ह । ५ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातून धुळेकडे जात असलेली चारचाकी खेडी कढोली फाट्यावर पाळधी बायपासला थांबलेली असताना मागून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत कार पुढील ट्रकमध्ये घुसून चक्काचूर झाली. दैव बलवत्तर असल्याने कार मधील एअरबॅग वेळेवर उघडल्याने पोलीस कर्मचारी व महिला डॉक्टर दोघे बचावले आहे. 

जळगाव येथील पोलीस कर्मचारी मनोज सुरवाडे सोमवारी हे सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास स्वतःची चार चाकी क्रमांक एमएच.१५.जीएक्स.५५५५ ने धुळेकडे जात होते. सकाळी ९ वाजेच्या सुमारास पाळधी बायपासवर खेडी कढोली फाट्यावर ते रस्त्याच्या कडेला चारचाकी लावून उभे होते. यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रक क्रमांक एमएच.१९.झेड.४५२६ ने त्यांना मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका जोरदार होता की चारचाकी पुढील ट्रक क्रमांक एमएच.१८.बीए.९४४१ मध्ये घुसून चक्काचूर झाली. 

दैव बलवत्तर असल्याने कारमधील दोन्ही एअर बॅग वेळेवर उघडल्याने मनोज सुरवाडे यांच्यासह महिला डॉक्टर बालंबाल बचावले आहे. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून प्रथमोपचार करण्यात आले आहे.

चारचाकीतून बाहेर काढण्यास लागला अर्धा तास

अपघातात चारचाकी चक्काचूर झाल्याने मनोज सुरवाडे हे गाडीतच फसलेले होते. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस ठाण्याचे कर्मचारी किशोर चंदनकर, किरण सपकाळे, दत्तात्रय ठाकरे, उमेश भालेराव यांनी घटनास्थळ गाठले. ट्रॅक्टरच्या मदतीने गाडीचा दरवाजा आणि इतर भंगार बाजूला करून अर्ध्या तासाने मनोज सुरवाडे यांना बाहेर काढण्यात यश आले. याप्रकरणी पाळधी पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतल्या असून तपास सुरू आहे.

पहा व्हिडीओ :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/256311442823616/

अमळनेरचे आमदार अनिल पाटील कोरोना पॉझिटिव्ह

0
anil patil corona positive

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांची अँटीजन चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तातडीने उपचार घेऊन त्यांनी स्वतःला घरीच आयसोलेटेड करून घेतले आहे. मात्र फारसी लक्षणे नसल्याने त्यांची प्रकृती उत्तमच आहे.

संपर्कात आले असतील त्यांनी तातडीने आपली कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन आमदारांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार पाटील यांची तोंडाची चव बदलून त्यांना थोडे बदल जांणवल्याने त्यांनी तातडीने प्रसिद्ध डॉ संदीप जोशी यांच्याकडे धाव घेऊन त्यांच्या सल्ल्याने एचआरसीटी तपासणी करुन घेतले त्यात नॉर्मल लक्षणे दिसून आली त्यानंतर दोनदा अँटीजन चाचणी केली असता दोन्ही चाचण्या पॉझिटिव्ह आल्यात,यामुळे डॉ संदीप जोशी यांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करून त्यांच्या घरीच स्वतःला आयसोलेटेड त्यांनी करून घेतले आहे.

फारसी लक्षणे नसल्याने व त्वरित तपासणी आणि उपचार सुरू केल्याने लवकरच ते यातून बरे होतील असा विश्वास डॉ संदीप जोशी यांनी व्यक्त केला आहे. 

शासन आदेश फाट्यावर : बाजार समितीत भरला ‘कोरोना बाजार’

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२१ । चेतन वाणी । जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. बहुतांश नागरिकांना लॉकडाऊन नको आहे तरीही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाही. शहरातील फळ भाजीपाला मार्केटमध्ये शासनाच्या सर्व नियमांना फाटा देत कोरोनाचा बाजारच भरल्याचे पहावयास मिळाले.

शहरातील बाजारात आणि बाजार समितीमध्ये नेहमी गर्दी होत असते. विक्रेत्यांकडून नियमांचे पालन होत नसताना त्यांच्यावर कारवाई केली तरी पुन्हा तासाभरात तीच स्थिती होते. भाजीपाला बाजारात गर्दी होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विशेष सूचना दिल्या आहेत.

भाजीपाला मार्केटला पहाटे ४ ते सकाळी ९ पर्यंत माल खरेदी-विक्री करणाऱ्यांची मोठी झुंबड उडत असून गर्दीत पाय ठेवायला जागा नसते. एकीकडे धार्मिक स्थळात जाण्यास प्रतिबंध केला जातो आणि दुसरीकडे बाजारात हजारोंच्या संख्येने गर्दी होते हा मोठा विरोधाभास आहे. गर्दीत कोरोनाचा एखादा संशयित किंवा संक्रमित रुग्ण फिरत असल्यास तो कितीतरी नागरिकांना बाधित करू शकतो याचा विचार कुणीही करत नाही.

पहा व्हिडीओ : 

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/129299585764308/

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केली शहरातील कोरोना सेंटरची पाहणी

0
kulbhushan patil

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शहरात असलेल्या सर्व कोविड सेंटरची आज पाहणी केली. यावेळी कोविड सेंटरमधील अनेक खाटा या रिकाम्या असल्याचे निदर्शनास आले.

यामधे शासकीय तंत्रानिकेत महाविद्यालय, महापालिकेचे कोविड केअर सेंटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर तसेच शहरातील इतर कोविड केअर सेंटर्स चा ही समावेश आहे.

कोविड केअर सेंटरची पाहणी केल्यानंतर उपमहापौर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांना भेट देऊन महाविद्यालयातील असलेल्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी महाविद्यालयात उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर्सची देखील माहिती घेतली. यावेळी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.रावलानी, महिला बालविकास समिती सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक प्रा. सचिन पाटील , नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, रेश्मा काळे, प्रतिभा देशमुख, चेतन सनकत, प्रतिभा पाटील, किशोर बाविस्कर आदींची उपस्थिती होती.
यापुढे शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर स्वतः महापौर व उपमहापौर रस्त्यावर उतरून कारवाई करणार आहे , असा इशारा ही उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी दिला आहे.

ब्रेक द चेन : मिनी लॉकडाऊन दरम्यान काय असेल सुरु; काय असेल बंद? जाणून घ्या…

0
lockdown

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२१ । राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:

शेतीविषयक कामे सुरु

शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.

दिवसा जमावबंदी; रात्री संचारबंदी

राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते

आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु

किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे

सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच

सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.
बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.

वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद

खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील

शासकीय कार्यालये- ५० टक्के उपस्थितीत

शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल

मनोरंजन, सलून्स बंद

मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.

प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद

सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील

खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वात पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल

ई कॉमर्स सेवा सुरु

ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल

सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे

 

शाळा- महाविद्यालये बंद

10 व १२ परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.

चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अमलबजावणी होईल.

आजारी कामगाराला काढता येणार नाही

बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे

तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट

5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार , बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.