⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

पाळधी बायपासला चारचाकी चक्काचूर : एअरबॅगमुळे बचावले दोघे

जळगाव लाईव्ह । ५ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातून धुळेकडे जात असलेली चारचाकी खेडी कढोली फाट्यावर पाळधी बायपासला थांबलेली असताना मागून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकने दिलेल्या धडकेत कार पुढील ट्रकमध्ये घुसून चक्काचूर झाली. दैव बलवत्तर असल्याने कार मधील एअरबॅग वेळेवर उघडल्याने पोलीस कर्मचारी व महिला डॉक्टर दोघे बचावले आहे. 

जळगाव येथील पोलीस कर्मचारी मनोज सुरवाडे सोमवारी हे सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास स्वतःची चार चाकी क्रमांक एमएच.१५.जीएक्स.५५५५ ने धुळेकडे जात होते. सकाळी ९ वाजेच्या सुमारास पाळधी बायपासवर खेडी कढोली फाट्यावर ते रस्त्याच्या कडेला चारचाकी लावून उभे होते. यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रक क्रमांक एमएच.१९.झेड.४५२६ ने त्यांना मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका जोरदार होता की चारचाकी पुढील ट्रक क्रमांक एमएच.१८.बीए.९४४१ मध्ये घुसून चक्काचूर झाली. 

दैव बलवत्तर असल्याने कारमधील दोन्ही एअर बॅग वेळेवर उघडल्याने मनोज सुरवाडे यांच्यासह महिला डॉक्टर बालंबाल बचावले आहे. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून प्रथमोपचार करण्यात आले आहे.

चारचाकीतून बाहेर काढण्यास लागला अर्धा तास

अपघातात चारचाकी चक्काचूर झाल्याने मनोज सुरवाडे हे गाडीतच फसलेले होते. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस ठाण्याचे कर्मचारी किशोर चंदनकर, किरण सपकाळे, दत्तात्रय ठाकरे, उमेश भालेराव यांनी घटनास्थळ गाठले. ट्रॅक्टरच्या मदतीने गाडीचा दरवाजा आणि इतर भंगार बाजूला करून अर्ध्या तासाने मनोज सुरवाडे यांना बाहेर काढण्यात यश आले. याप्रकरणी पाळधी पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेतल्या असून तपास सुरू आहे.

पहा व्हिडीओ :