⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 13, 2024

भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातेय : एकनाथराव खडसे

0
eknath khadase

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप खडसेंनी केलाय. भाजपने सुरवातीपासूनच ओबीसी नेत्यांना न्याय दिला आहे. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांच्या काळात भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात केलं जात असल्याचा आरोप खडसेंनी पुन्हा एकदा केलाय.

माझ्यावरील आरोप, चौकशी आणि आता ‘ईडी’ (ED) चौकशी ही त्यांचेच षडयंत्र असल्याचा आरोपही खडसेंनी केला.

भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करत छळ केला असून सर्वात जास्त गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला, असा आरोपही खडसे यांनी केलाय.

सध्या राज्याचीच नव्हे तर देशातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे अशावेळी राजकारण करणे योग्य नाही, असे खुद्द नितीन गडकरींनी सांगितले. त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. कोरोना पूर्णपणे हद्दपार करेपर्यंत प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, असे मत आपण महिनाभरापूर्वीच मांडल्याचे खडसेंनी सांगितले.

अशा चौकशांना मीदेखील घाबरत नाही

माझ्यावरील आरोप, चौकशीबाबत मी विधिमंडळात अखेरपर्यंत उत्तर मागितले, मात्र ते मिळाले नाही. ‘ईडी’ (ED)व सीबीआयसारख्या संस्थांच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. परंतु, अशा चौकशांना भुजबळ अथवा मीदेखील घाबरत नाही, असे खडसे म्हणाले.

जळगाव जिल्ह्यातील अधिकृत कोरोना आकडेवारी : १० मे २०२१

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । जळगाव जिल्हा प्रशासनाच्या कोवीड विभागाने पाठविलेल्या दिवसभराच्या अहवालात आज सोमवारी जिल्ह्यात ८४४ नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ८२२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात भुसावळ, चाळीसगाव आणि चोपडा तालुक्यातील कोरोना संसर्ग वाढलेला आहे.

दरम्यान दिलासादायक बाब अशी की,जळगाव शहरात सातत्याने जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याची नोंद होत असताना आज सोमवारी जळगाव शहरात   ६१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये आता कोरोनाची संसर्ग वाढत आहे.

जळगाव जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून कोरोना संसर्गाचा कमी झालेला असून दररोजचे आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांसह बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज सोमवारी ५१५५ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून ८४४ नवे रुग्ण समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख ३० हजार ७३१ इतकी झाली आहे. तर ८२२ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १८ हजार ५६८ इतका झाला आहे.

तर आज मृताचाही आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसून येत आहे. आज १२ जणांचा मृत्यू झाला असून मृताचा एकूण आकडा २ हजार ३४९ वर गेला आहे. सध्या जिल्ह्यात ९८१४ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- ६१, जळगाव ग्रामीण- १६, भुसावळ- १३२, अमळनेर- १२, चोपडा- १५०, पाचोरा- २०, भडगाव- १५, धरणगाव-६०, यावल- २३, एरंडोल- ७४, जामनेर- ४७, रावेर- २६, पारोळा-०३, चाळीसगाव- ९४, मुक्ताईनगर-५२, बोदवड- ४९, अन्य जिल्ह्यातील- १०.

गृह विलगीकरणाचे शास्त्रोक्त नियम पाळावे, अन्यथा गंभीर होण्याचा धोका

0
dr yogita bavaskar

कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेक जण गृह विलगीकरण (होम कोरोनटाईन) चा पर्याय स्वीकारत आहेत. मात्र गृह विलगीकरण करताना काय नियम पाळावे याबाबत प्रत्येक नागरिकांनी माहिती जाणून घ्यावी, अन्यथा लक्षणे वाढल्यास प्रकृती गंभीर होण्याची शक्यता असते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या जनऔषधवैद्यक शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. योगिता बावस्कर यांनी दिली आहे.

शासनाने सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींना गृह विलगीकरण पर्याय उपलब्ध केला आहे. अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरात एका खोलीत विलगीकरण करावे. कोणत्याही परिस्थितीत घरातील सर्व, विशेष करून ५० वर्षावरील तसेच मधुमेह, रक्तदाब व अन्य गंभीर स्वरूपाचा आजार असलेल्या व्यक्तीपासून वेगळे राहा. ज्या खोलीत रुग्ण राहणार असेल त्या खोलीत हवा मोकळी हवी. खिडकी उघडी हवी. रुग्णाने पूर्ण वेळ तीन पदरी (ट्रिपल लेअर) मास्क वापरावा. हा मास्क आठ तासपर्यंत वापरू शकतात. हा मास्क परत वापरता येत नाही. घरातील दुसऱ्या व्यक्तीसोबत संपर्क येत असेल तर एन ९५ मास्क वापरावा, हा मास्क ४ ते ५ वेळा वापरता येतो, या मास्कला धुवू नये, कोरोनाबाधित व्यक्तींने व्यक्तिगत वस्तूंना घरातील इतर सदस्यांचा स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. बावस्कर यांनी केले आहे.

कोरोनाबाधित रुग्णाने जास्तीत जास्त आराम करावा, पाणी भरपूर प्यावे, सकस आहार, फळे खावी. कोरोनाबाधित रुग्णाने पालथे झोपावे, त्यामुळे ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होते. घरात पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर असणे गरजेचे आहे. ऑक्सिजन सॅच्युरेशन व तापमान दर ४ तासांनी मोजावे व त्याची नोंद करून ठेवावी. ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजण्यासाठी हाताच्या मधल्या बोटाला ऑक्सिमीटर लावावे. हे करताना नेलपॉलिश असल्यास काढून टाकावी. स्टँच्युरेशन ९५ वर हवा नाहीतर त्वरित डॉक्टरांना संपर्क करावा. तापमान ३८ डिग्री सेल्सियस अथवा १००. ४ च्या वर असल्यास ताप समजावा, अशी महत्वपूर्ण माहिती डॉ. योगिता बावस्कर यांनी दिली आहे.

दिवसातून दोन वेळा “६ मिनिट वॉक टेस्ट” करावी. आधी ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजावे, मग ६ मिनिटे खोलीत चालावे, त्यानंतर परत सॅच्युरेशन मोजावी. जर सॅच्यूरेशन ९४ पेक्षा कमी किंवा आधीच्या नोंदीपेक्षा ३ अंकाने कमी झाले तर डॉक्टरना त्वरित संपर्क करून दवाखान्यात दाखल व्हावे. कोरोना रुग्णाने पूर्वीची औषधे नियमित सुरु ठेवावी. डॉक्टरांच्या निगराणीखाली कोरोनाचे औषधोपचार घ्यावे. श्वास घेण्यास त्रास, सॅच्युरेशन ९४ पेक्षा कमी, छातीत दुखणे, छातीत भारीपणा वाटणं, चक्कर येणे अशी लक्षणे दिसली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित रुग्णालयात दाखल व्हावे, असेही डॉ. बावस्कर यांनी सांगितले.

गृह विलगीकरण कधी संपवावे ?
कोरोनाची लक्षणे सुरु झाल्यावर १० दिवसांनी व मागील ३ दिवसात ताप आला नाही तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने गृह विलगीकरण संपवू शकतो. परत कोरोना चाचणी करण्याची गरज नाही.

घरात काळजी घेण्याऱ्या व्यक्तीला सूचना
रुग्णाची काळजी घेत असलेल्या व्यक्तीने तीन पदरी मास्क तसेच बाधित व्यक्तीच्या खोलीत जायचे तर एन ९५ मास्क वापरावा. मास्कच्या समोरील बाजूला हात लावू नये. वारंवार चेहऱ्याला हात लावू नये, हात २० सेकंदांपर्यंत धुवावे. आजारी व्यक्तीला त्याच्याच खोलीत जेवण द्यावे, त्याची भांडी वेगळी असावी. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या घरातील सर्व व्यक्तींनी संपर्कात आल्यापासून पाचव्य दिवशी किंवा कोरोना सदृश्य लक्षणे दिसताच कोरोनाची तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन डॉ. बावस्कर यांनी केले आहे.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू त्वरित खरीदी करा

0
pachora

मागील गेल्या महिन्याभरापासून पाचोरा आणि भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यातील देखील शेतकीसंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वारी,मका व गहू खरेदी करण्यासाठी पाचोरा तालुक्यातून ज्वारी साठी ९१६ मकासाठी ७०० व गहू साठी ०५ शेतकऱ्यांनी तसेच भडगाव तालुक्यातून ज्वारीसाठी १०६२ मकासाठी ५६० गहूसाठी १२ शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली असून प्रत्यक्षात खरेदीसाठी आज पावेतो सुरुवात झालेली नाहीये.

त्यात शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम जवळ आला असून त्याच्या पूर्वतयारीसाठी त्यांच्या रब्बी हंगामाचा शेतमाल विक्री झाल्यानंतरच येणाऱ्या पैशातून त्यांचे सर्व नियोजन अवलंबून असते मात्र शासन स्तरावरून खरेदी संदर्भात कुठलाही आदेश नआल्याने सदर शेतमाल खरेदी सुरू झालेली नाही अशा पद्धतीने या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे. तसेच कोरोना सारख्या महामारीत या सरकारने शेतकरी बांधवांना पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. असे यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले तसेच  जिल्हयातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू खरेदी त्वरित  होण्यासाठी खासदार पाटील यांनी  वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भात जी.आर. काढण्यास पाठपुरावा करू असे देखील सांगितले.

पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी मका व गहू त्वरित खरेदी करून त्यांना दिलासा द्यावा तसेच वरील नोंदणीकृत शेतकऱ्यांन व्यतिरिक्त पाचोरा तालुक्यातून अजून जवळपास ४०० व भडगाव तालुक्यातील जवळपास १५० शेतकर्‍यांनी खरेदीसाठी ऑफलाईन अर्ज शेतकीसंघाकडे जमा केला असून त्याची ऑनलाइन ची मुदत संपल्याने शेतकीसंघाकडून सदर ऑनलाइन प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे.

तरी ऑनलाईन ची प्रक्रिया पुन्हा काही दिवसांसाठी सुरू करून उर्वरित शेतकऱ्यांची देखील नावनोंदणी करून घेण्यात यावी अशी मागणी यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली.याप्रसंगी भाजपा चे जिल्हा सरचिटणीस व जि.प.सदस्य मधुकर काटे,जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील,शहराध्यक्ष रमेश वाणी उपस्थित होते

सिंधी कॉलनीत अवैधरित्या विदेशी दारू विकणाऱ्याला पकडले

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत विनापरवाना विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करत ९ हजार २४० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. भारत शाम कुकरेजा(वय २५ वर्षे. रा.बाबा खोली, सिंधी कॉलनी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत असे की, शहरातील बाबा खोली, सिंधी कॉलनीत विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सिंधी कॉलनीत जाऊन वाहन दूर उभे करून पान टपरीच्या आडोशाला एक इसम हा एका प्लास्टिकच्या मोठ्या पिशवीतून काहीतरी काढताना दिसला. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर अचानक रात्री छापा टाळून त्याच्या ताब्यातील पिशवी खोलून पाहता त्यात विदेशी दारू व बियरच्या बाटल्या आढळून आल्या आहे.

त्यात ९ हजार ९५० किंमतीच्या  मॅकडॉल्ड नंबर 01 व्हीस्की कंपनीच्या 180 एम.एल. मापाच्या विदेशी दारुच्या 33 बाटल्या, २ हजार २१० रु किंमतीच्या किंगफिशर स्ट्रॉग कंपनीच्या 750 एल. एल. मापाच्या काचेच्या बियरच्या बाटल्या, 2,080/- रु किमतीचे किंगफिशर स्टॉग कंपनीचे 500 एम.एल. मापाचे बियरचे कंपनी सिलबंद  बाटल्या असा एकूण ९ हजार २४० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. यावेळी विनापरवाना विदेशी दारूची विक्री केल्याने भारत कुकरेजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विचखेडे येथे शेतकऱ्याचा संसार खाक, तिघे बचावले : बकऱ्या, बोकडांची राख!

0
parola

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । पारोळा तालुक्यातील विचखेडे येथे शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागल्याची घटना आज सोमवारी पहाटे वाजेच्या सुमारास घडली. या आगीत शेतकऱ्याच्या चार बकऱ्या व दोन बोकडांचा होरपळून मृत्यू झाला व संसारोपयोगी वस्तू जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

याबाबत असे की, विचखेडे येथे सुपडू एकनाथ सूर्यवंशी हे सोलर प्रकल्प येथे वाॅचमन म्हणून कामाला गेले होते. घरात पत्नी व दोन मुले झोपली होती. त्यावेळी घराला अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच महिलेने घरातून मुलांसह पळ काढला. आरडाओरडा करीत शेजाऱ्यांना बोलवले. यावेळी संपूर्ण गावातील लोक मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले; परंतु आग जोरात असल्याने आटोक्यात येत नव्हती.

नंतर पारोळा नगरपालिकेचा अग्निशामक बंब मागवण्यात आला. चालक मनोज पाटील व सहकाऱ्यांनी आग विझवली. पण अंगणात बांधलेले दोन बोकड, पाच बकऱ्या, पाच कोंबड्या, टीव्ही, खाट, कपडे आदी घरातल्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. घराचे छतदेखील पडून गेले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे.

यावेळी घटनास्थळी उपसरपंच पंकज बाविस्कर यांनी पाहणी करून दोन हजार रुपयांची मदत केली. तलाठी सचिन आठोले, पोलीस सरपंच आदींनी घटनेचा पंचनामा केला.

जिल्ह्यातील २५ दिव्यांग गरजू बालकांच्या कुटुंबाला महिनाभराचा किराणा भेट

0
jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्यात अनेक दिव्यांग बालकांना घरीच राहावे लागत आहे. दिव्यांग बालकांचे पालक देखील घरीच असून कुटुंबाच्या खाण्यापिण्याची अडचण होत आहे. शहरातील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि इनरव्हील क्लब ऑफ बॉम्ब बायव्ह्यूतर्फे जिल्ह्यातील २५ दिव्यांग गरजू बालकांच्या कुटुंबाला महिनाभर पुरेल असा किराणा भेट देण्यात आला.

दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या पोस्टल कॉलनीतील कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रमात औपचारिकता म्हणून काही किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी, उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, चेतन वाणी, बाळू चौधरी, विनोद शिरसाळे, जयश्री पटेल, अनिता पाटील, सोनाली भोई, लक्ष्मी वाघ, वनिता पवार आदी उपस्थित होते.

उर्वरित किराणा किट शिरसोली, चाळीसगाव येथील बालकांच्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले आहेत. इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बायव्ह्यू व श्यामश्री भोसले यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले आहे. लॉकडाउन काळ असेपर्यंत उडाणच्या माध्यमातून दिव्यांग बालकांना मदत पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे. किराणा किटमध्ये गव्हाचे पीठ, डाळ, चहा, साखर, तिखट, हळद, तेल, साबण, कांदा, बटाटे, टूथपेस्टचा समावेश आहे.

सागर पार्क मैदानावर उभारले जाणार अत्याधुनिक स्वच्छतागृह ; महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

0
jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । ‘सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सागर पार्कवर सुप्रिम फाऊंडेशनच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत महिला व पुरुषांसाठी अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. या कामाचे महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते विधिवत मंत्रघोष व वाद्याच्या निनादात श्रीफळ वाढवून भूमिपूजन झाले. येत्या साडेतीन महिन्यांत हे काम पूर्णत्वास येणार आहे. ‘सुप्रिम इंडस्ट्रीज’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री.संजय प्रभुदेसाई, श्री.जी.के. सक्सेना, उपमहापौर मा.श्री.कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी, उपायुक्त श्री.पवन पाटील, माजी महापौर श्री.नितीन लढ्ढा, श्री.विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख श्री.शरद तायडे, नगरसेवक श्री.नितीन बरडे, श्री.अनंत (बंटी) जोशी, श्री.कैलास सोनवणे, श्री.प्रशांत नाईक, अ‍ॅड.शुचिता हाडा, सौ.दीपमाला काळे, सौ.सरिता माळी-कोल्हे, आर्किटेक्ट श्री.शिरीष बर्वे, महापालिकेचे शहर अभियंता श्री.अरविंद भोसले, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी माजी महापौर नितीन लढ्ढा मनोगतात म्हणाले, की सागर पार्क हा शहरवासीयांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. त्या अनुषंगाने येथे उभारल्या जाणार्‍या अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. या प्रकल्पाचे काम उत्तमप्रतीचे व अतिशय आधुनिकपूर्ण सेवा-सुविधांयुक्त होईल, अशी खात्री आहे. यापूर्वी फुले मार्केटनजीक जुन्या महापालिकेच्या जागेवरील सार्वजनिक शौचालय उभारले गेलेले असून ते उत्तम पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पासाठी काहीही अडचणी असल्यास जळगाव महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल.

प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक श्री.नितीन बरडे व श्री.अनंत (बंटी) जोशी या दोघांच्या पुढाकाराने व विशेष पाठपुराव्याने या कार्याला सुरुवात झाली आहे. यावेळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी ‘सुप्रिम’चे आभार मानत जळगाव शहराला दात्यांची परंपरा नेहमीच राहिलेली असून, वेळोवेळी दानशूर व्यक्तींसोबत महापालिका समाजोभिमुख कार्य करण्यास तत्पर असते, असेही सांगितले.

सुप्रिम इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक प्रभुदेसाई म्हणाले, की सामाजिक दायित्वातून काम करण्याची नेहमीच सुप्रिम फाऊंडेशनची आजवर भूमिका राहिली आहे. संबंधित काम साडेतीन महिन्यांत पूर्णत्वास येईल. तसेच पुढील टप्प्यात रामदास कॉलनी व शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. सदरील कामे नुसतीच पूर्णत्वास आणणे आमचा हेतू नाही, तर त्यांची देखभालही तितकीच तन्मयतेने आम्ही करीत असतो. या अनुषंगाने अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून मिळणारे आशीर्वाद आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरणारे असतात. महापालिकेचे सहकार्यही आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.

अक्षय तृतीया, ईदनिमित्त दुकाने सुरू ठेवावी : एकनाथराव खडसे यांची मागणी

0
eknath khadse

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । येत्या १४ मे रोजी अक्षय तृतीया व ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेतील दुकाने सुरु ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.

हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो. तसेच सध्या मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरु आहे. मुस्लीम समाजामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. येत्या शुक्रवारी ( दि.१४ ) रमजान ईद सोबत अक्षय तृतीयेचा पवित्र सण आहे. यामुळे नागरिकांना सणासाठी विविध वस्तू खरेदी करावयाच्या असतात. मात्र सद्यस्थितीत फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरु आहेत.

या संदर्भात भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष शफी पहेलवान व नगरसेवक मुन्ना तेली यांनी एकनाथ खडसे यांच्याकडे सणानिमित्त दुकाने उघडण्याची मागणी केली असता खडसे यांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे उद्या दि.११ मे पासून ते १४ मे पर्यंत सकाळी ७ ते ११ या कालावधीत सुकामेवा, कापड व इतर साहित्याची दुकाने सुरु ठेवण्याची मागणी केली आहे.

तसेच मुक्ताईनगर येथील उपनगराध्यक्षा मनीषा पाटील यांच्या निवेदनानुसार अक्षय तृतीया व ईदनिमित्त आवश्यक असलेली दुकाने सुरु ठेवण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.