जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यात धडक कारवाई केली. ९ हजाराची लाच घेताना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाला रंगेहात अटक केली. भूषण जवाहर राठोड (वय ३४) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर सापळा पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, नाईक किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे यांनी यशस्वी केला आहे.
याबाबत असे की, २२ वर्षीय तक्रारदाराची गुरुकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल, नांदेड जिल्ह्यात आहे. या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या २० प्रशिक्षणार्थी चालकांना परवाना काढण्यासाठी ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालया, नांदेड येथे अनुत्तीर्ण करण्यात आले होते. त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी म्हणून सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भूषण जवाहर राठोड यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.
दरम्यान तक्रारदाराने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गुरुवार दि. २५ जुलै रोजी विभागाने पडताळणी केली असता तक्रारदारांकडून तडजोडीअंती ९ हजाराची लाच स्वीकारताना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भूषण राठोड यांना रंगेहात अटक करण्यात आली त्यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.