जळगाव शहरराजकारण

मोठी बातमी ! जळगाव मनपात भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीची घोषणा; जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित?

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत महायुतीनं चांगली कामगिरी केली असून यांनतर आता जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजप आणि भाजप-शिवसेना शिंदे गटाने युतीची घोषणा केली आहे.

जळगाव शहराच्या विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्र लढणार असून, जागावाटपाचा आणि सत्तेचा ‘फॉर्म्युला’ निश्चित झाला असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या निर्णयामुळे महायुतीतील कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. मात्र महायुतीमधील तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. राष्ट्रवादीसोबत स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे, असा विश्वास यावेळी भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे

जळगाव एमआयडीसी परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, खासदार स्मिताताई वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, आमदार चंद्रकांत सोनवणे आणि आमदार अमोल पाटील यांसह दोन्ही पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून युती होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती, ज्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button