खळबळजनक ! भाजप आमदाराने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर सहा गोळ्या झाडल्या
जळगाव लाईव्ह न्यूज । 3 फेब्रुवारी 2024 । मुंबईमधील कल्याण-डोंबिवलीत परिसरात मोठा राजकीय राडा झाला असून भाजप आमदाराने चक्क पोलिस ठाण्यातच गोळीबार केला. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यावर, महेश गायकवाड याच्यावर सहा गोळ्या झाडल्या.या प्रकारामुळे शहरचं नव्हे तर अख्खा ठाणे जिल्हा हादरला. या घटनेनंतर उल्हासनगरसह कल्याणमध्ये तणावाचं वातावरण असून शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत.
महेश गायकवाड यांच्यावरती झालेल्या गोळीबाराचा निषेध करत कल्याण पूर्व येथे दुकाने बंद करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून निषेध करण्याचे आव्हान केल्यानंतर ही दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महेश गायकवाड यांच्या शिवसेना शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गणपत गायकवाडांसह 5 जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान या गोळीबाराप्रकरणी गणपत गायकवाडांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे मात्र आणखी तिघे अद्याप फरार आहेत. आरोपी नागेश बाडेकर, वैभव गायकवाड आणि विकी गणित्रा या फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या हल्ल्या प्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडलाही यात आरोपी बनवण्यात आलं आहे. आरोपींवर हत्येचा प्रयत्न आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल आहे.