⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

गुलाबराव पाटलांच्या विरोधात उद्या ठाकरे गटाचे शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरात सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद पेटला असून ठाकरे गटातील उपनेत्या सुषमा अंधारे विरुद्ध जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील असे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करीत आहेत. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत चुकीचा शब्दप्रयोग केल्याने त्यांच्यावर दाखल करण्याच्या मागणीसाठी उद्या ठाकरे गटाकडून शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने जळगावात आल्या होत्या. पहिल्या दिवसापासून सुषमा अंधारे विरुद्ध पालकमंत्री गुलाबराव पाटील असे शाब्दिक युद्ध रंगले आहे. मुक्ताईनगर येथील सभेला परवानगी नाकारल्यानंतर सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती.

सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर देताना ना.गुलाबराव पाटील यांनी, शिवसेनेने पिक्चर चालविण्यासाठी सुषमा अंधारे सारखी नटी आणली असे वक्तव्य केले आहे. ना.गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांचा अपमान केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उद्या दि.६ रोजी सकाळी ११ वाजता शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहे.