जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२६ । पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत असून, राज्यामध्ये सत्तापालट होण्याची चिन्हे दिसत आहेत. सुरुवातीच्या अटीतटीच्या लढतीनंतर आता भारतीय जनता पक्षाने (BJP) तृणमूल काँग्रेसवर (TMC) मोठी आघाडी घेतली आहे. ताज्या कलांनुसार, भाजपने बहुमताचा आकडा सहज पार केला असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४ विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. एका जागेवर फेरमतदान होणार असल्याने, आज २९३ जागांचा निकाल जाहीर होत आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळत होती. मात्र, जसजशा मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत आहेत, तसतशी भाजपने मुसंडी मारली असून तब्बल १८७ जागांवर आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष अवघ्या ९८ जागांवर मर्यादित राहिल्याचे दिसत आहे.

गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ पश्चिम बंगालच्या सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी हे कल अत्यंत धक्कादायक आहेत.भाजपच्या या अनपेक्षित मुसंडीमुळे टीएमसीच्या गोटात शांतता पसरली आहे. तर दुसरीकडे, बहुमताचा १४८ चा आकडा सहज पार केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या ही आकडेवारी प्राथमिक कलांवर आधारित असली, तरी भाजपची आघाडी खूप मोठी असल्याने राज्यात सत्तापरिवर्तन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही तासांतच निवडणूक आयोग अंतिम अधिकृत आकडेवारी जाहीर करेल, ज्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.












