जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील बनावट पत्त्यावर पाठविण्यात येणाऱ्या बायोडिझेलच्या टँकरवर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळ ही कारवाई झाली.
गुजरातमधील कच्छ येथून जळगावकडे बायोडिझेलने भरून जाणाऱ्या या टँकरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव चौफुलीजवळ थांबवत चालकाची चौकशी केली. दरम्यान पोलिसांनी टँकर चालकास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील मुक्ताईरोडवरील बनावट पत्त्यावरील बॉन-बॉन फर्मकडे हा माल पोहोचविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी या संदर्भात तपास केला असता सदर फर्म अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले आहे. चालकाकडे बनावट ई-वे बिल आणि टॅक्स इन्व्हाइस तयार करून ही वाहतूक केली जात असल्याचे देखील पोलीस तपासात उघडत झाले आहे.
आता या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह चाळीसगाव रोड पोलिसांनी हा तपास सुरू ठेवला असून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणात संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १७ लाख ५ हजार ६२३ रुपयांचे बायोडिझेल आणि १० लाख रुपयांचा कंटेनर देखिल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.