महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा मोठा इशारा; आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट

मार्च 27, 2026 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२६ । महाराष्ट्रातील हवामानात सातत्यानं बदल पाहायला मिळत असून एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढला असताना राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. विदर्भ, मराठवाड्यानंतर काल अवकाळी पावसाने कोकणाला झोडपून काढले. दरम्यान, हवामान खात्यानं राज्यात अवकाळी पावसाबाबत मोठा इशारा दिला आहे. ३१ मार्च पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला असून शासनाने खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

Rain

आज या जिल्ह्यांना अलर्ट?

आज पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

३० मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ३१ मार्चलाही काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now