⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मोठी बातमी : महानगरपालिकेत २० दिवस बिल होत नाहीत क्लियर !

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । महानगर पालिकेत मक्तेदारांची बिल पास होण्यासाठी आठवडा जातो ज्यामुळे कामांना वेग येत नाही अशी तक्रार आयुक्त विद्या गायकवाड यांना मक्तेदारांनी केली. शुक्रवारी मनपा आयुक्तांच्या दालनात महापालिकेतील सर्व मक्तेदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहर अभियंता नरेंद्र जावळे यांच्यासह इतर अभियंता देखील उपस्थित होते.मक्तेदारांनी आपल्या अडचणी मांडत, महापालिकेत बिलांसाठी अनेक दिवस फेऱ्या माराव्या लागत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेत २ दिवसाच्या आत बिलांची रक्कम मिळत असते. मात्र, महापालिकेत ती रक्कम मिळण्यासाठी अनेक आठवडे वाट पहावी लागते अशी तक्रार मक्तेदारांनी केली. यावर मक्तेदारांच्या ज्या अडचणी असतील त्या सर्व अडचणी आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करु, मात्र, कामांमध्ये जर गुणवत्ता आढळून आली नाही तर कोणत्याही मक्तेदाराला माफी नाही असाच इशारा आयुक्तांनी दिला. बिलांबाबत ज्या अडचणी आहेत. त्या नक्की सोडविल्या जातील, यासाठी मक्तेदारांनी कामांमध्ये गुणवत्ता आणण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जळगाव शहराच्या विकासकामांसाठी मिळालेल्या निधीतून सुरु असलेल्या कामांची आयुक्त विद्या गायकवाड यांनी नुकतीच पाहणी केली होती. यावेळी अनेक कामांचा दर्जा खराब असल्याचे आढळून आले असल्याचे त्या स्वतः म्हणाल्या होत्या व त्यांनी मक्तेदारांना त्यासाठी खडे बोलही सुनावले होते. मनपा आयुक्तांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून, अनेक झालेली कामे पुन्हा दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. तसेच शुक्रवारी आयुक्तांनी मक्तेदारांची बैठक घेवून, कामांमध्ये गुणवत्ता ठेवा, जर कामांमध्ये गुणवत्ता आढळून आली नाही तर बिलांची रक्कम देखील दिली जाणार नाही असा इशारा मनपा आयुक्तांनी मक्तेदारांना दिला आहे.

महापालिका आयुक्तांनी शहरातील रस्ते, गटारी व इतर कामांची पाहणी केल्यानंतर अनेक कामांबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच काही मक्तेदारांना झालेल्या कामात दुरुस्ती करण्याचे आदेश दिल्यानंतर नाराज झालेल्या मक्तेदारांनी कामे थांबविण्याबाबतचा इशारा देखील दिला होता. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी मक्तेदारांची बैठक घेतली.