मोठी बातमी : जिल्ह्यातील ८९ गावांच्या पाणी योजनांना मंजुरी !
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । केंद्र व राज्य सरकारच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत आज जिल्ह्यातील ८९ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून यासाठी तब्बल ५८ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील हे ऍक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. या योजनेचा पहिला टप्पा जिल्ह्यात अतिशय यशस्वीपणे पार पडला असून दुसरा टप्पादेखील याच तडफेने पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे. तर पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने ७० गावांच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळणार असून यासाठी ६० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
जलजीवन मिशन ही योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमधून राबविण्यात येत आहे. याच्या अंतर्गत देशातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे शुध्द पाणी पुरवठा करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. यात आधीचे निकष बदलून दरडोई ५५ लीटर या निकषाने पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये गुरांसाठी लागणार्या पाण्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. ना. गुलाबराव पाटील हे आधीच्या सरकारमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री असतांना त्यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांना प्रचंड गती दिली होती. आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये देखील तेच खाते मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रचंड गतीने जिल्ह्यातील योजनांना मान्यता देण्यास प्रारंभ केला आहे. अलीकडेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणार्या जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया, पाणी पुरवठा अभियंता श्री. भोगावडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या बैठकीत जिल्ह्यातील ८९ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यासाठी ५८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर पुढील आठवड्यातच ७० गावांच्या योजनांना मान्यता मिळणार असून यासाठी ६० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. या संदर्भात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जलजीवन मिशनला यशस्वीपणे कार्यान्वित करण्याला आपले प्राधान्य आहे. ही योजना राज्यभरात गतीने सुरू असून जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरात शुध्द पाणी पुरवठा करण्याला आपले प्राधान्य राहणार आहे.
या गावातील योजनांना मिळाली मंजुरी
यात अमळनेर तालुक्यातील रढावण व राजोरे, कन्हेरे, पाडळसरे, फाफोरे बुद्रुक, गांधली; अमळनेर तालुक्यातील ब्राह्मणे, कढोली, जळू; चाळीसगाव तालुक्यातील हातले; चोपडा तालुक्यातील मराठा, भारडू, दोंदवाडे, रूईनखेडा प्र अडावद, बुधगाव व माचले; जळगाव तालुक्यातील करंज, रामदेववाडी, कुर्हाडदे, रिधूर, वाकडी, घार्डी, लमांजन प्र.बो; जामनेर तालुक्यातील सुनसगाव खुर्द आणि बुद्रुक, टाकळी बुद्रुक, वडगाव बुद्रुक, नवापूर आणि मोरद, हिवरखेडे दिगर व हिवरखेडे, कासली, शेरी, शेंगोळे, पिंपळगाव बुद्रुक, भागदरे, लोंढरी खुर्द आणि बुद्रुक, गोंदेगाव व गणेशनगर, तसेच टाकळी खुर्द या गावांचा समावेश आहे. यासोबत धरणगाव तालुक्यातील निशाणे खुर्द, लाडली, तरडे खुर्द, चिंचपुरे बुद्रुक, कंडारी बुद्रुक, साळवे, फुलपाट आणि दहिदुले; पाचोरा तालुक्यातील पहाण, लाख, बिल्दी बुद्रुक, गाळण बुद्रुक, चिंचखेडे बुद्रुक तर पारोळा तालुक्यातील चिखलोद खुर्द आणि बुद्रुक, राजवड, जोगलखेडे, सबगव्हाण प्र.; सबगव्हाण खुर्द व उडणीदिगर या गावांचा समावेश आहे. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी, डोलारखेडा, दुई,, वायला आणि धामणदे, यावल तालुक्यातील किनगाव खुर्द, हरीपुरा, चिखली खुर्द, न्हावी प्र. अडावद, सातोद, पिंपरूड, पिंप्री, भालशिव आणि नायगाव तर रावेर तालुक्यातील सुलवाडी, वाघडी, पाडले खुर्द, नेहेते, शिंगाडी, आभोडा खुर्द आणि बुद्रुक, पाडले बुद्रुक, विवरे खर्द, उतखेडे, केर्हाळे, गाते. बोरखेडा, तामसवाडी, विवरे खुर्द, वाघोदा खुर्द, थेरोळे, सावखेडा खुर्द आणि कर्जोद या गावांच्या योजनांना मंजुरी मिळाली आहे.