⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मोठी बातमी : जळगाव-जालना रेल्वेमार्गाचा होणार हवाई सर्वे, उद्यापासून सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२२ । जालना ते जळगाव १७४ किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग सुरु करण्यात येणार असून त्याच्या सर्वेचे काम हाती घेण्यात येणार आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये अंतिम सर्वेला खर्च असून ‘फायनल लोकेशन सर्वे’ ८ फेब्रुवारी २०२२ रोजी मंजूर केला गेला होता. उद्यापासून विमानाद्वारे हवाई सर्वेला सुरुवात केली जाणार असून त्यासाठी विमान अकोला येथे दाखल झाले आहे.

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत जालना-जळगाव रेल्वे मार्गाचा ‘फायनल लोकेशन सर्वे’ ८ फेब्रुवारी २०२२ रोजी मंजूर केला गेला होता. या सर्वेचे काम भौतिकदृट्या फिजीकली सुरुच आहे. मात्र त्यासोबतच आता ट्रॅकचा हवाई सर्वे देखील केला जाणार आहे. हवाई सर्वेसाठी अकोला येथे आज विमान दाखल झाले असुन या विमानाद्वारे रडार (लिडार) चा वापर करुन हवाई सर्वे केला जाणार आहे १४ ते १७ मे अश्या चार दिवसांत हे हवाई सर्वेक्षण होणार असून हे विमान एका दिवसाला ५० किलोमीटरचा सर्वे करणार आहे. यामुळे फायनल लोकेशन सर्वेला गती मिळेल.

जालना ते जळगाव रेल्वे मार्गाची लांबी १७४ किलोमीटर असून फायनल लोकेशन सर्वेला खर्च साडेचार कोटी रुपये येणार आहे. फायनल सर्वेचे काम आटोपल्यानंतर पुढील कामाला गती येऊन लवकरात लवकर रेल्वे मार्ग कार्यान्वित करणे शक्य होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सतत पाठपुरावा सुरु ठेवला तर हे काम जलद गतीने होण्यास मदत होईल.