पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ आता खाद्यतेलाच्या किमतीतही मोठी वाढ; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले?

मे 21, 2026 6:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधनाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या जागतिक संकटाचा मोठा फटका आता भारतालाही बसत असून देशात महागाईचा आलेख उंचावला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत खाद्यतेलाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या अवघ्या दोन महिन्यांत खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो मागे १५ ते २० रुपयांनी वधारल्या आहेत.

oil 1 jpg webp

भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पाम तेल विदेशातून आयात केले जाते. मात्र, जागतिक संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाचे भाव कडाडले आहेत. सध्या कडक उन्हाळा आणि लग्नसराईचा मोसम नसल्याने बाजारात म्हणावी तशी तेजी किंवा ग्राहकांची गर्दी नाही. असे असूनही तेलाचे दर चढेच आहेत. आगामी काळात पाम तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जर ही भाववाढ झाली, तर सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची दाट शक्यता आहे.

पूर्वी आपल्याकडेच जवस, करडई यांसारख्या पारंपरिक तेलबियांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायचे आणि स्थानिक पातळीवरच तेल तयार केले जायचे. मात्र, बदलत्या काळात आपण खाद्यतेलासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहू लागलो आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा फटका थेट बसू नये, यासाठी देशात पुन्हा एकदा तेलबियांच्या उत्पादनात मोठी वाढ करण्याची गरज असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

इंधनानंतर आता खाद्यतेलाच्या दरात होणारी ही वाढ सामान्यांच्या खिशाला आणखी झळ पोहोचवणारी ठरेल. आगामी दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजार निवळणार की तेलाचे भाव आणखी कडाडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now