⁠ 

Big Breaking : महावितरण अभियंत्याने मागितली लाच, ट्रॅपची कुणकुण लागताच ६ लाख सोडून पसार

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । लघू उद्योगासाठी योजनेतून डीपी मंजूर करून देण्यासाठी सहा लाखांची लाच मागणार्‍या नेरीतील सहाय्यक अभियंत्यांवर एसीबीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार अभियंत्याच्या घरीदेखील पोहोचले. मात्र. संशयीत आरोपीला संशय आल्याने त्याने घराबाहेर पाय टाकत चारचाकीतून पोबारा केला. तर एसीबीचे पथक आरोपीला पकडण्यासाठी पुढे आल्यानंतर पथकाच्या अंगावरही आरोपीने चारचाकी घातली. ही घटना जामनेर शहरात शुक्रवारी घडल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालिग्राम पाटील असे संशयीत आरोपीचे नाव आहे. पाटील याने एका तक्रारदाराला लघू उद्योगासाठी वीज डीपी हवी असल्याने त्यासाठी 14 लाखांचे कोटेशन लागेल. मात्र, मी तुम्हाला फुकटात डीपी मिळवून देतो मात्र, त्यासाठी सहा लाखांची लाच लागेल, असे सांगितले. तक्रारदाराने जळगाव, नाशिकऐवजी थेट औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली. सुमारे दोन महिन्यांपासून पथक आरोपीच्या मागावर होते. मात्र, यापूर्वी एकदादेखील आरोपीने लाचेबाबत संशय आल्याने ती स्वीकारली नव्हती.

गुरुवारी सकाळी ११ वाजता पथकाने ट्रॅप लावला, तक्रारदार संशयीत आरोपीच्या घरी लाचेची सहा लाखांची रक्कम घेवून पोहोचला. यावेळी संशयीत आरोपी कामाचे निमित्त करून बाहेर त्यावेळी घराबाहेर असलेली गर्दी पाहून संशय बळावल्याने त्याने थेट चारचाकी काढली त्यातून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी एसीबीने त्याच्यावर झडप घातली असता आरोपीने पथकाच्या अंगावरच गाडी घालण्याचा प्रयत्न केला, अशी सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपीचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.