जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत वेटिंग तिकीटांसंदर्भात एक मोठी घोषणा केलीय. वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानक आणि प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार नाही, असे अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले.रेल्वे स्थानकांवर गर्दी अनियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतण्यात आल्याचं समोर आले.

अलीकडेच मुंबईतील बांद्रा स्थानक आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या होत्या. दिल्लीच्या स्थानकावर प्रमाणापेक्षा जास्त तिकीट विक्रीमुळे ही गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. या परिस्थितीवर उपाय म्हणून रेल्वेने आता कठोर पावले उचलली आहेत. आता फक्त ट्रेनमधील उपलब्ध जागांनुसारच तिकीटे विकली जातील. त्यामुळे वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश नाकारला जाईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले.
गर्दी व्यवस्थापनासाठी अनेक उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. रुंद फूट ओव्हरब्रिज, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉर रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. सण, उत्सव आणि यात्रांच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी होत असते. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने स्थानकाबाहेर होल्डिंग एरिया तयार केले आहेत. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येईपर्यंत प्रवाशांना आत प्रवेश दिला जाणार नाही, असेही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. या निर्णयांमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.