खान्देशातील प्रवाशांना दिलासा! भुसावळ-पुणे एक्सप्रेस लवकरच सुरु होणार!

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२३ । जळगावसह खान्देशातील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस सोयीची ठरत होती. मात्र ही गाडी गेल्या दोन तीन महिन्यापासून तांत्रिक कारणास्तव बंद असून ती फक्त इगतपुरीपर्यंत धावत आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अशात आता ही एक्सप्रेस लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

यातच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील विकासकामांचे लोकार्पण आज शनिवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना त्यांनी भुसावळ ते पुणे ही नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले.

भुसावळ, जळगावसह जिल्ह्यातून पुण्याला जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावर रेल्वे गाड्या उपलब्ध असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. यामुळे खासगी वाहतुकदारांच्या मनमानीपणामुळे प्रवाशी हतबल झाले आहेत. विशेष करून सणासुदीच्या काळांमध्ये लक्झरी बसचालक हे अव्वाच्या सव्वा दर आकारणी करत असल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसतो. यामुळे या मार्गावर एक्सप्रेस ट्रेन सुरू करावी अशी मागणी कधीपासूनच करण्यात येत आहे.

भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही कल्याण-पनवेल मार्गाने पुण्याला जाते. यामुळे मनमाड-दौंड मार्गाने पुण्याला जाणार्‍यांसाठी हुतात्मा एक्सप्रेस सोयीची नाही. भुसावळ ते पुणे आणि पुणे ते भुसावळ एक्सप्रेस सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी आहे. या संदर्भातील निवेदने प्रवाशी संघटनांच्या वतीने अनेकदा देण्यात आलेली आहेत. तथापि, याचा काहीही फायदा झालेला नाही. या पार्श्‍वभूमिवर, रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी या मागणीबाबत सकारात्मकता दाखविली आहे.

रावसाहेब दानवे यांनी भुसावळ ते पुणे ही नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले. तथापि, ही रेल्वे गाडी फेर्‍याने म्हणजेच नंदुरबार, उधना, वसई मार्गाने पुण्याला जाईल अशी शक्यता आहे. यामुळे वेस्टर्न लाईनवर जाणार्‍या प्रवाशांना लाभ होणार असला तरी भुसावळहून थेट पुण्याला जाणार्‍यांना मोठा फेरा पडल्याने ते यातून जाणार नाहीत. यामुळे ही ट्रेन सुरू झाली तरी ती दौंड आणि मनमान मार्गाने जाणारी असावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.