⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

बीएचआर प्रकरणी ‘वेट अँड वॉच’, मोठा मासा लवकरच गळाला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । जळगावसह राज्यात एकाच दिवशी धरपकड करीत कारवाई केल्याने बीएचआर प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले असून ठेवीदारांशी दलाली करणारे देव पाण्यात टाकून बसले आहेत. एका आमदाराचे नाव दिवसभर जोडले जात असले तरी दुसरा आमदार थोडक्यात बचावला आहे. सध्या तरी ‘वेट अँड वॉच’ची भुमिका घ्यावी लागणार असून मोठा मासा पुढील आठवड्यात पथकाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरण गेल्या काही महिन्यात अचानक गाजत आहे. घोटाळ्याची तपासचक्रे वेगाने पुढे सरकत असून अनेक दिग्गजांची नावे समोर येत आहे. गुरुवारी पहाटेच पथकाने धरपकड सत्र सुरू करून राज्यभरातून भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर) याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे, प्रितेश चंपालाल जैन (धुळे) अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद) जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा, प्रमोद किसनराव कापसे (अकोला) यांना ताब्यात घेतले.

जळगावातून निघताना पथकाकडून तपासाची व्याप्ती वाढवत आणखी काही जण कारवाईच्या टप्प्यात असल्याचे संकेत दिले आहे. सध्या नॉट रीचेबल असलेले आमदार आणि ठेवीदार व कर्जदारांमध्ये दलाली करणारे मात्र रडारवर आहेत हे निश्चित. जळगावात दिवसभर कारवाई सुरू असताना एक आमदार देखील अडकणार अशी चर्चा रंगत होती. कारवाई करण्यात आलेले बरेच जण माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय होते तर काही आ.सुरेश भोळे यांचे निकटवर्तीय आहेत. दोन्ही पदाधिकारी भाजपचे असून मुंबईत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भेटीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी यामागे मोठा मासा गळाला लावण्याचे नियोजन असल्याचे बोलले जात आहे.

बीएचआर घोटाळ्याची खिचडी शिजत असताना शहरातील एक व्यावसायिक, शिक्षण संस्था चालक व इतर काही पुढाऱ्यांनी कमिशनचा मलिदा खाल्ला होता. बीएचआरशी त्यांचा थेट संबंध नसला तरी ठेवीदारांना आपल्या मुदत ठेवींच्या पावत्या मोडून ३० टक्के रक्कम मिळवून देण्यात यांची दलाली मात्र मोठी भुमिका बजावणारी ठरली आहे. पथक पुढील आठवड्यात पुन्हा जळगावात येण्याची शक्यता असून दलाल आणि मोठा मासा त्यांना गावण्याची शक्यता आहे. दलाल कंपूत कारवाईने मोठी खळबळ उडाली असून ते देखील रफूचक्कर होण्याच्या मार्गावर आहेत. तूर्तास तरी जळगावकरांनी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत राहून पुढे काय होते हे पाहणे पसंत केले आहे.

 

हे देखील वाचा:
आमदार असो की खासदार कारवाई होणारच : एकनाथराव खडसे
बीएचआर प्रकरण : अटकेची प्रक्रिया पूर्ण, संशयितांना पुण्याला नेणार