जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली. मुंबईतील पीएमएलए कोर्टानं आता १५ जुलैपर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे.

गेल्या आठवड्यात जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने एकनाथराव खडसे यांना समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. यावेळी खडसेंची ईडीकडून आठ तास चौकशी करण्यात आली होती. यापुढेही जेव्हा जेव्हा गरज भासेल, तेव्हा चौकशीचे समन्स बजावले जाईल, असे ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी खडसे यांना कार्यालयातून निघताना आवर्जून सांगितले होते.
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याचं काम सध्या सुरु आहे आणि चौधरी यांची आणखी चौकशी करणं गरजेचं आहे, असं ईडीने न्यायालयाला सांगितलं. आता गुरुवार म्हणजेच १५ जुलैपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
ईडीच्या आरोपानुसार २०१६मध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीचा भूखंड गिरीश यांच्या नावे विकत घेतला गेला. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना खरेदी व्यवहाराच्या नोंदीनुसार गिरीश यांनी तो ३.७५ कोटी रुपयांना विकत घेतल्याची तक्रार आहे. पुण्यातील एका व्यावसायिकाने या व्यवहाराविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीच्या आधारे चौकशी, तपास करून खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश यांच्यासह जागेचे मूळ मालक अब्बार उकाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.
या घडामोडीचा आधार घेत ईडीने समांतर तपास सुरू केला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने खडसे कुटुंबीयांविरोधात गुन्हा (ईसीआयआर) नोंदवला होता. डिसेंबर महिन्यात ईडीने खडसे यांना समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. खडसे जानेवारी महिन्यात ईडीसमोर हजर झाले. त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली होती.