⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

सावधान! क्रेडिट कार्डद्वारे १ लाख ४० हजारांची फसवणूक; घ्या ही काळजी

जळगाव लाईव्ह न्यूज| ४ ऑगस्ट २०२३। काही दिवसांपूर्वी एका महिला उद्योजिकेला अचानक क्रेडिट कार्ड वापरून ५० हजार, ५० हजार आणि ४० हजार असे तीन व्यवहार झाले असल्याचे मेसेज आले आणि एकूण १ लाख ४० हजार रुपये चोरट्यांनी एका मर्चंट अकाउंटला ट्रान्सफर करून घेतले आणि त्या खात्यातून चोरट्यांनी झारखंड राज्यात वेगवेगळ्या ‘एटीएम’मधून १ लाख ३९ हजार त्वरित काढूनही घेतले होते.

हे सर्व व्यवहार होताना महिला उद्योजिकेला ‘ओटीपी’ विचारला गेला नव्हता. मात्र, पैसे हस्तांतरीत झाल्यावर लगेच क्रेडिट कार्डचा वापर झाल्याचे मेसेजे आले होते. महिला उद्योजिकेचे एका बँकेचे फक्त क्रेडिट कार्ड Credit Card घेतलेले होते. ते कार्ड आणि क्रेड ॲप APP वापरून त्याद्वारे त्या पेमेंट करायच्या. एक दिवस ॲपद्वारे करत असलेला एक व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही आणि ‘अंडर प्रोसेस’ असा मेसेज आला. म्हणून त्यांनी ‘क्रेड’ ॲपच्या ‘कस्टमर केअर’कडे तक्रार केली.

त्या ऑफिसरने लवकरच तुमच्या तक्रारीची दखल घेऊन, परत तुमच्याशी संपर्क साधतो, असे सांगितले आणि अर्ध्या तासात एका नंबरवरून फोन आला, पलीकडून कस्टमर केअर ऑफिसर बोलतोय, म्हणून त्याने काय झाले ते सविस्तर विचारले आणि बाकी माहितीही घेतली. हा फोन बंद झाला आणि पाच मिनिटांच्या अंतराने लागोपाठ ४० हजार, ५० हजार आणि ५० हजार रुपयांचे व्यवहार कार्डवरून झाले आणि हे पैसे ‘डेबिट’ झाल्याचा मेसेज आला.

त्यानंतर महिला उद्योजिकेने क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. सायबर सेल आणि बँकेत तक्रार केली. सायबर सेलने तातडीने हालचाल केली, मात्र चोरटयांनी त्या खात्यातून बहुतांश रक्कम काढून घेतली होती आणि चोरट्यांच्या खात्यात फक्त राहिलेले रुपये ९५० परत मिळाले. यामध्ये कस्टमर केअर म्हणून जो नंबर वापरला गेला तो चोरट्यांचा असावा आणि चोरट्यांनी मिळालेली माहिती वापरून हा गुन्हा घडला.

क्रेडिट कार्ड द्वारे होणारी फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कस्टमर केअरच्या नावाने फोने करून सगळी माहिती विचारून घेऊन पैसे काढून घेण्याचे बरेचसे प्रकार उघडकीस येत आहे. ओटीपी येत नसूनही कॉलच्या माध्यमातून पैसे काढून घेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरतांना किंवा कॉल वर बोलताना काळजी घेणे आवश्यक आहे.

कस्टमर केअर नंबर शोधताना त्या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवरूनच घ्यावा. गुगलवर शोधल्यावर चोरट्यांच्या बोगस कस्टमर केअर नंबर मिळण्याची शक्यता आहे आणि भांबावलेल्या स्थितीत आपल्याकडून चूक व्हायची शक्यता आहे. कस्टमर केअर नंबर साधारणतः १८०० ने सुरु होतो. हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. आपली कार्डसंबंधी गोपनीय माहिती उदा, कार्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर, अकाऊंट नंबर, आयडी, पासवर्ड ,पत्ता ,पॅन कार्ड,आधारकार्ड सुरक्षित राहतील याची काळजी घेणे.

आपल्या क्रेडिट कार्ड व्यवहाराची मर्यादा अगदी मर्यादित ठेवावी. उदा. फक्त ५ हजार. मोठे व्यवहार शक्यतो ‘एनइएफटी’(NEFT) सारख्या माध्यमातून करावे. बँकेचा किंवा इन्शुरन्स कंपनीचा क्रेडिट कार्ड वापराचा विमा घ्यावा. हल्ली सर्व बँकांनी आपले क्रेडिट किंवा डेबिट कार्ड मर्यादा कमी करणे वा वाढवणे हे नेट बँकिंग साईटवर सुलभ केले आहे. आपली सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्डची मागून पुढून एक झेरॉक्स काढून ठेवावी, अडचणीच्या वेळेस मोठे नंबर आणि त्या मागे असलेले कस्टमर केअर नंबर उपयोगी पडतील. आपल्या क्रेडिट कार्डवरील प्रत्येक व्यवहार तपासावा.

कार्ड वापरताना भरमसाट पॉईंट्ससाठी कोणतेही ॲप वापरणे धोकादायक. कार्डचा पासवर्ड वारंवार बदलावा. ताबडतोब https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. बँकेत समक्ष जाऊन तक्रार नोंदवा, नुसती तक्रार नोंदवून थांबू नका, भरपूर पाठपुरावा करावा. आपल्या फोनवर किंवा कम्प्युटरवर असलेले या संदर्भातील काही पुरावे, संदर्भ असतील तर जपून ठेवा.ते करण्यासाठी संगणक सल्लागाराची मदत घ्या. हे पुरावे कोर्टात जरूर पडल्यास देता येतील. १९३० अथवा १५५२६० (महाराष्ट्रासाठी) या नंबरवर संपर्क साधा. शक्य असेल आणि आवश्यक असेल, तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.

(संबंधित लेखक सीए आणि संगणक कंट्रोल, सायबर गुन्हेविषयक अभ्यासक आहेत.)