⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण

वीजबिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । महावितरणचे अधिकारी, कर्मचारी थकीत वीजबिल वसुली करण्यासाठी गुरुवारी दुपारी १.३० वाजता सिंधी कॉलनीत गेले असता एका प्राैढाने त्यांना मारहाण केली. डोक्यात कृषी अवजार (टिकाव) मारण्याचा प्रयत्न झाला. संपूर्ण प्रकार पथकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

सहायक अभियंता जयेश रजनिकांत तिवारी यांनी यासंदर्भात फिर्याद दिल्यानुसार, तिवारी हे दीक्षितवाडीतील पावर हाऊस येथे नोकरीस आहेत. गुरुवारी दुपारी ते कार्यालयीन सहायक योगेश जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम धना लोंढे, तंत्रज्ञ मधुकर कांबळे व कंत्राटी कर्मचारी गणेश जगन्नाथ नन्नवरे यांच्यासोबत सिंधी कॉलनी परिसरात थकीत वीजबिल वसुली व सूचना करण्यासाठी गेले होते. या वेळी संंतोषी माता मंदिराजवळील टिकमदास परमानंद पोपटानी यांच्या नावाने असलेल्या वीजमीटरचे २४६० रुपये बिल गेल्या ७५ दिवसांपासून थकबाकी असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिवारी यांनी पोपटानी यांना आवाज देऊन बाहेर बोलावून वीजबिल भरण्याच्या सूचना केल्या. त्याचा राग आल्याने किशोर टिकमदास पोपटानी यांनी थेट पथकावर हल्ला चढवला. टिकाव उचलून डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. झटापट केली. त्यात योगेश जाधव यांच्या कानाला व सोनकांबळे यांच्या पाठीवर दुखापत झाली. दगड उचलून फेकून मारण्याचा प्रयत्न केला. परिसरातील लोकांनी पोपटानी यांना पकडून शांत केले.

याप्रकरणी तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोपटानी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पोपटानीला ताब्यात घेतले आहे. पोपटानी याने पथकावर हल्ला करताच भुवनेश पवार यांनी माबाइलमध्ये चित्रण केले आहे. त्यात पोपटानी हा टिकाव उगारून मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते आहे. परिसरातील नागरिक, महिलांनी त्याला पकडल्यामुळे अप्रिय घटना टळली. अभियंता व कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय राज्य उपाध्यक्ष सुरेश पाचंगे यांनी निषेध केला.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.