जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । कुऱ्हे पानाचे येथील खंडेराव यात्राेत्सव मंगळवारी दाेन वर्षांच्या खंडानंतर यंदा माेठ्या उत्साहात पार पडला. कुऱ्हे पानाचेसह, महादेव माळ, मांडवे दिगर, मुशाळ तांडा, भिलमळी, मोंढाळे, वराडसिम, गोजोरे, सुनसगाव आदी परिसरातील ग्रामस्थांनी या यात्रोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानिमित्त बारा गाड्या ओढण्यात आल्या. त्यात आबालवृद्ध माेठ्या उत्साहाने सहभागी झाले हाेते.
सकाळपासून खंडेराव महाराजांसह गावातील विविध मंदिरांमध्ये विधिवत पूजा करण्यात अाली. ग्रामस्थांनी दिवसभर यात्रेत खरेदीचा आनंद घेतला. सायंकाळी परंपरेनुसार कालिंकामाता मंदिरापासून बारी वाड्यापर्यंत बारा गाड्या ओढण्यात आल्या. कोराेना काळात दोन वर्षांपासून यात्राेत्सव बंद होता. त्यामुळे या वर्षी यात्रोत्सवासाठी येथून राेजगार, व्यवसायासाठी इतर शहरांमध्ये गेलेले नागरिक गावी आले होते. त्यामुळे यंदाच्या यात्रोत्सवात आनंदाची भर पडली. भगत संतोष रमेश पारधी यांनी बारा गाड्या ओढण्याची जबाबदारी सांभाळली. बारा गाड्या पाहण्यासाठी पुरुषांप्रमाणे महिलांची संख्याही जास्त होती. दोन वर्षांनंतर यात्रेत पाळणे, विविध खेळणी, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने पहावयास मिळाली.