⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

बाप रे.. भुसावळात माथेफिरूने तीन दुचाकी जाळल्या, लाखो रुपयांचे नुकसान!

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे, वाहने जाळण्याचे प्रकार सुरूच असून भुसावळात पुन्हा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. शहरातील दत्त नगरात घराबाहेर लावलेल्या तीन दुचाकी अज्ञात विकृताने पेटवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली तर याच परीसरातून दुचाकीसह तीन वाहनांच्या महागड्या बॅटर्‍या चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जामनेर रोडवरील दत्त नगरात आप्पा फुलचंद सावळे हे पत्नी, दोन मुलांसह वास्तव्यास असून हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. दैनंदीन कामासाठी त्यांच्याकडे तीन दुचाकी आहेत. गुरुवारी मध्यरात्री घराबाहेरील मोकळ्या जागेवर उभी असलेली पल्सर (एम.एच.19 डी.पी.6211), प्लेझर (एम.एच.डी.टी.6864) व यामाहा (एम.एच.19 ए.एस.9301) दुचाकीला अज्ञात विकृताने पेट्रोल टाकून पेटवून दिले. गुरुवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान ही घटना घडली.

दुचाकी पेटवल्यानंतर आगीचा मोठा भडका उडाल्याने सावळे कुटूंबियांना तीन वाजेच्या सुमारास जाग आल्याने मिळेल ‘त्या’ साधनांनी त्यांनी दुचाकींना लागलेली आग विझवली मात्र तोपर्यंत वाहने पूर्णपणे जळाल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाले. गुरुवारी दुपारी आप्पा सावळे यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्याने अज्ञाताविरोधात भादंवि 435 व 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक तेजस पारीस्कर करीत आहेत.

दत्त नगरात विकृतांकडून दुचाकी पेटवण्यात आल्या असतानाच जामनेर रोडवरील नाहाटा महाविद्यालयाजवळील सीताराम नथूराम सैनी यांच्या एस.पी.मार्बलसमोरून दुचाकी (एम.एच.19 ए.यु.1506) चोरट्यांनी लांबवली. रात्री दिड वाजेच्या सुमारास दोन चोरटे दुचाकी चोरताना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत तसेच याच परीसरातील महेश नगरातून माजी नगरसेवक पिंटू ठाकूर व अमीन शेख यांच्या मालकिची ट्रॅक्टरची प्रत्येकी 12 हजार रुपये किंमतीची बॅटरी तसेच मयूर नागोरी यांच्या मालकिच्या डंपरमधून दोन बॅटरी चोरट्यांनी लांबवल्या. सैनी व ठाकूर यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात निरीक्षक राहुल गायकवाड यांची भेट घेवून चोरीबाबत माहिती दिली.

रविवारी मध्यरात्री जळगाव रोडवरील सौभाग्य मंगल कार्यालयाच्या शेजारी शंकर गिरधरप्रसाद मिश्रा यांची पल्सर (एम.एच.19 डी.वाय.6774) व स्प्लेंडर (एम.एच.19 ए.सी.9629) ला अज्ञाताने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला. शहरात अलीकडील काळात वाढलेल्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास शून्य असताना दररोज नवीन होणार्‍या चोर्‍यांमुळे नागरीक व वाहनधारक धास्तावले आहेत. पोलिसांची गस्त कागदावरच असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत.