⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

चर्चा तर होणारच..! शिंदे गटाचे आ. किशोर पाटलांनाही मंत्रिपदाचे वेध, पाचोऱ्यात झळकले बॅनर्स

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ (Cabinet Expansion) विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातून कोणाला लॉटरी लागणार, याची उत्सुकता आहे. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे चर्चा आहे. त्यातील काही आमदारांनी मंत्रिपद मिळण्याची इच्छा बोलूनही दाखवली आहे. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (kishor patil) यांनीही मंत्रीपद मिळण्याची इच्छा यापूर्वी बोलून दाखवली होती. आताही किशोर पाटील यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे.

इतकेच नाही तर त्यांच्या संपूर्ण मतदारसंघात ‘भावी मंत्री आप्पासाहेब’ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असा मजकूर लिहिलेले बॅनर्सही लागले आहेत. त्यामुळे किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळणार की पुन्हा वेट अँड वॉचवर राहणार याकडे लक्ष लागलं आहे.

भडगाव-पाचोरा मतदार संघातील आमदार किशोर पाटील यांचा आज वाढदिवस असून यानिमित्त त्यांच्या मतदार संघात ठिकठिकाणी गावांमध्ये भावी मंत्री आमदार किशोर पाटील अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. ‘भावी मंत्री आप्पासाहेब’ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंही या बॅनर्सवर लिहिलेलं आहे. त्यामुळे आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळतं की काय अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

दरम्यान, आ. पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदारसंघात आज भव्य रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्याला आमदार किशोर पाटील उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मला मंत्री पण नको आहे, मी स्वतःलाच मुख्यमंत्री समजतो असे म्हणणारे आमदार किशोर पाटील यांनी आता स्वतः मंत्री पदाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

किशोर पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही अपेक्षा व्यक्त केली आहे. जनतेच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. ते आशीर्वाद आता किती पावतात हे मला माहीत नाही. मात्र स्वतः अपेक्षा व्यक्त करतोय, जर संधी मिळाली तर निश्चित संधीच सोने करेन, असं किशोर पाटील म्हणाले. किशोर पाटील हे पाचोऱ्याचे आमदार आहेत.