इन्स्टाग्रामवर प्रेम जडले अन् बांगलादेशी तरुणी थेट जळगावात; तरुणीसह प्रियकर जेरबंद

मे 11, 2026 5:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावात ‘सीमा हैदर’ प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असून, सोशल मीडियावरून झालेल्या प्रेमासाठी बांगलादेशची सीमा ओलांडून आलेल्या एका तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणीला आश्रय देणाऱ्या तिच्या जळगावातील प्रियकरावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या कारवाईमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

bls

नेमकं प्रकरण काय?

पोलीस तपासानुसार, अटक करण्यात आलेली तरुणी कोणीका राणी शामलचंद्र राय (वय २०, रा. बांगलादेश) असून, तिची ओळख जळगावातील जोशी पेठ परिसरातील सोन्याचा कारागीर चिन्मय जगन्नाथ वाला याच्याशी ‘इन्स्टाग्राम’वर झाली होती. हळूहळू या ओळखीचे प्रेमसंबंधांमध्ये रूपांतर झाले. लग्न करण्याच्या उद्देशाने कोणीका हिने कोणतीही वैध कागदपत्रे, पासपोर्ट किंवा व्हिसा नसताना बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

ती गेल्या काही दिवसांपासून जोशी पेठ परिसरातील भोई गल्ली येथे चिन्मयच्या घरी राहत होती. परिसरात एक परदेशी महिला संशयास्पदरीत्या वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी कोणीका हिला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान तिच्याकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही वैध दस्तऐवज नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच ती अवैध मार्गाने भारतात दाखल होऊन जळगावात राहत असल्याचेही उघड झाले आहे. सदर प्रकरणात इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक कायदा २०२५ अंतर्गत कलम २१, ०८ आणि २४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, कोणीका आणि चिन्मय वाला या दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी चर्चा रंगली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी करीत आहेत.

दरम्यान, जळगाव पोलीस दलाकडून शहर आणि जिल्ह्यात संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अवैध वास्तव्य, बनावट कागदपत्रे आणि बेकायदेशीर घुसखोरीविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now