⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

वादळी वाऱ्यामुळे केळीचे नुकसान : मदतीची अपेक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मार्च २०२२ : जिल्ह्यात मार्च महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसा दरम्यान अनेक महसूल मंडळांमध्ये 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची नोंद झाली आहे. यामुळे विमा कंपन्या तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे

हवामान नावावर आधारित फळपिक विमा योजनेअंतर्गत एक मार्च ते 31 जुलै दरम्यान वाऱ्याचा वेग 40 किलोमीटर पेक्षा जास्त गेल्यास केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा संरक्षण अंतर्गत संबंधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई पात्र ठरत असते. मात्र विमा निकषांमध्ये वादळानंतर विमा कंपनी, महसूल, कृषी, विभागाकडून नुकसानीचे प्रमाण निश्चित करणे गरजेचे असते. अशावेळी लवकरच हे निश्चित करण्यात यावेत व शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

जिल्ह्यात ३ ते ७ मार्च दरम्यान निर्माण झालेल्या वादळी पावसाच्या स्थिती दरम्यान जिल्ह्यातील २९ महसूल मंडळांमध्ये ४० किमी किव्वा त्यापेक्षा अधिकच्या वाऱ्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, या भागातील शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेले नाहीत. त्यामुळे या महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे. या महसूल मंडळांमध्ये अमळनेर, मारवड, पातोंडा, वरणगाव, चहार्डी, चोपडा, हातेड, लासूर, धरणगाव, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद, एरंडोल, भोकर, जळगाव, नशिराबाद, पिप्राळा, फत्तेपूर, पहुर, मुक्ताईनगर, कुन्हाड, चोरवड, शेळवे, रावेर, सावदा, किनगाव व साकळी या महसूल मंडळांचा समावेश आहे.