जळगाव लाईव्ह न्यूज : 31 ऑक्टोबर 2023 : मागील वर्षातील केळी पीक विम्याची व या वर्षातील २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची दक्षता घेण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या.
जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त तक्रार अर्जांवर आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सुनावण्यात घेण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया चे जिल्हा प्रतिनिधी राहूल पाटील, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील २०२२-२३ अंतर्गत केळी पिकांचे नुकसान भरपाई बाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून अप्पर मुख्य सचिव (कृषी), मंत्रालय, मुंबई यांच्याकडे पाठपुरावा करून दिवाळीपूर्वी विमा कंपनीने शेतक-यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करावी.
प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत २०२३-२४ साठी जळगाव जिल्ह्यातील २७ महसूल मंडळात २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाईची अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. कंपनीचे सर्व आक्षेप यापूर्वीच नाशिक विभागीय आयुक्तांनी फेटाळले आहेत. तेव्हा २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाईची रक्कम ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात यावी. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.