⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

एरंडोल येथे भूमापकाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल येथील भूमी अभिलेख कार्यालयातील प्रमुख भूमापकाने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. त्यांना जळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चाळीसगाव येथील रहिवाशी व एरंडोल येथील भूमी अभिलेख कार्यालयात प्रमुख भूमापक म्हणून कार्यरत असलेले संजय नामदेव पाटील (वय-५२) यांनी सोमवारी रात्री कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी कार्यालयातील कर्मचारी संजीव माळी यांनी या घटनेची माहिती संजय पाटील यांच्या कुटुंबियांना दिली. कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील खोलीचा दरवाजा तोडून त्यांना रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

यावेळी डॉक्टरांना त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत, पाटील यांना २०१९ मध्ये प्रमुख भूमापकचा पदभार मिळाला होता. त्यापूर्वी आर.एस.जाधव हे प्रमुख भूमापक होते. सोनवणे यांनी डाटा इंट्री केली नाही. शासनाकडून मिळालेला मोबदला जाधव व सोनवणे यांनी घेतला. व्ही.एल.पाटील यांनी मोजणीचे काम दुसऱ्याकडून डीएससी करुन घेतली. मोजणीला संजय पाटील यांना पाठवले, आत्महत्या करीत आहे, असे नमूद केले आहे.