मुक्ताईनगरात पत्रकारांवर हल्ला; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगरातील सुरु सलेल्या अवैध धंद्यांबाबत स्थानिक पत्रकारांनी प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध केलेल्या वृत्तांचा राग मनात ठेवत मोटारसाईकलवर आलेल्या दोन अज्ञात युवकांनी हाॅटेल यादगार लगत मंगळवारी रात्री अंधाराचा फायदा घेत वृत्तसंकलनारून परतणाऱ्या तीन पत्रकारांवर धमकावत जीवघेणा हल्ला केला. मोटारसायकलची तोडफोड करीत नुकसान करण्यात आले.याबाबत मुक्ताईनगर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर शहरातील सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत साहसिक न्युजचे स्थानिक पत्रकार पंकज तायडे,लाईव्ह ट्रेड न्युजचे पंकज कपले व मंडे टु मंडे न्युजचे प्रतिनिधी अक्षय काठोके यांनी शहरातील सट्टा-मटका तसेच अवैधरीत्या सुरू असलेल्या धंद्याबाबत सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते.परिणामी मटका माफीयांची पोलीसांकडुन धरपकड करण्यात आली होती. याबाबत राग मनात येऊन रात्री अंधाराचा फायदा घेत हाॅटेल यादगार जवळ वृत्तसंकलन करुन परतणाऱ्या या तिघंही पत्रकारांवर दोन अज्ञात युवकांनी मोटरसाईकलवरुन येत दगडफेक करीत काठीने मारहाण करण्यात आली.तसेच पत्रकारांची मोटारसायकलची तोडफोड केली.आमच्या विरोधात बातम्या लावल्यामुळे तुम्हाला जीवे ठार मारण्यात येईल किंवा पैसे देऊन मारहाण केली जाईल अशा प्रकारे धमकावले.याबाबतची फिर्याद पंकज कपले व अक्षय काठोके यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दिली असुन अज्ञाताविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशन ला कलम ३२३,४२७ प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके करीत आहे.