यावल बस आगारात १२० कर्मचारी झाले हजर
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । गेल्या काही महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी कामावर परतल्याने, यावल आगारातील बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. एकूण २४० कर्मचाऱ्यांपैकी १२० कर्मचारी शनिवारी कामावर हजर झाले. तर उर्वरीत कर्मचारी सोमवारपर्यंत परतणे अपेक्षित आहे. सोमवारपासून आगाराची सेवा पूर्वपदावर येत सर्व बसफेऱ्या सुरू होतील, असे आगार व्यवस्थापकांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. शनिवारी यावल आगारात ६० चालक, ६० वाहक असे १२० कर्मचारी कामावर हजर झाले. त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एसटी बससेवा बऱ्यापैकी सुरू करण्यात आली आहे. तर सोमवारपर्यंत संपूर्ण १२० चालक आणि १२० वाहक असे एकुण २४० कर्मचारी कामावर परतणे अपेक्षित आहे. व सर्व कर्मचारी हजर झाल्यावर सोमवार नंतर पूर्ण क्षमतेने यावल आगार पुन्हा सुरू होईल. पूर्णपणे १०० टक्के फेऱ्या सुरू केल्या जातील असे आगार व्यवस्थाप जी. पी. जंजाळ यांनी सांगितले. तर बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.