⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

आजारी आजीला पाहण्यासाठी आलेल्या नातवाला हृदयविकाराचा झटका; नातवापाठोपाठ आजीनेही सोडला जीव

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । यावल तालुक्यातील फैजपूर येथून हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. आजारी आजीला पाहण्यासाठी आला मात्र काकाच्या दारात येताच नातवाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. नातवाच्या मृत्यूनंतर दोन तासांनी आजीचाही मृत्यू झाला. कमलाबाई कोंडू मोरे आणि वैभव विष्णु मोरे अशी मयत आजी-नातवाची नावे असून या घटनेमुळे मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

फैजपूर शहरातील लक्कड-पेठ भागात डी के मोरे ज्वेलर्सचे दत्तात्रय मोरे वास्तव्याला आहेत. त्यांची आई कमलाबाई या त्यांच्याकडे राहत असतात, तर त्यांचे दुसरे भाऊ विष्णू मोरे हे त्यांच्या कुटुंबासह फैजपूर शहरातीलच भारंबे वाड्यात राहतात. आई कमलाबाई यांची प्रकृती गंभीर असल्याबाबत दत्तात्रय मोरे यांच्याकडून मंगळवारी सकाळी भाऊ विष्णू मोरे यांना कळविण्यात आले. आजीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यावर विष्णू मोरे यांचा मुलगा वैभव ऊर्फ विक्की हा आजीला पाहण्यासाठी काकाच्या घराकडे निघाला.

काकाच्या घराची पायरी चढताच वैभव याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यात तो खाली कोसळला, या ठिकाणच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. वैभवला डॉक्टरांनी मयत घोषित केले. या घटनेने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असता, दुसरी दुःखद घटना घडली. नातू वैभवच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन तासांनी वैभवची आजी कमलाबाई यांचाही मृत्यू झाला. आजी आणि नातवाची एकत्रच अंत्ययात्रा निघाली अन् सर्वांना अश्रू अनावर झाले.