नाशिक जिल्ह्यातील शस्त्र तस्कर चोपडा ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । चोपडा ग्रामीण पोलिसांनी शस्त्रांची तस्करी रोखत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटकेतील पाचही संशयीत नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आरोपींकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल, पाच जिवंत काडतूस व चारचाकी कार जप्त करण्यात आली.
ही कारवाई गुरुवारी सायंकाळी ६ वाजता लासूर-सत्रासेन रस्त्यावर करण्यात आली. अटकेतील संशयीतांमध्ये किरण कमलाकर शिंदे (२४, लासलगाव, ता.निफाड), टिनू उर्फ दशरथ रामचंद्र पवार (३५), रामदास विश्वनाथ दाभाडे (३०), युवराज भगवान माळे (२६), वाहन चालक केशव बंडूजी वखरे (४६, सर्व रा.पिंपळगाव बसवंत, जि.नाशिक) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. संशयितांकडून ६० हजार रुपये किंमतीचे दोन पिस्टल, पाच हजार रुपये किंमतीचे पाच जिवंत काडतूस, तीन लाख रुपये किंमतीची स्वीप्ट असा एकूण ३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोपडा ग्रामीण निरीक्षक कावेरी कमलाकर यांना शस्त्र तस्करीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सत्रासेन-लासूर रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चारचाकी (एम.एच.०१ बी.एङ्ग.०७०८) सुसाट येत असताना पोलिसांनी अडवत तपासणी केली असता संशयीताकडे दोन गावठी कट्टे व पाच जिवंत काडतूस आढळले. आरोपींनी हे कट्टे मध्यप्रदेशातील उमर्टी गावातील एका सरदारजीकडून विकत घेतल्याची कबुली दिली आहे. या शस्त्रांची तस्करी करून ते त्यांची विक्री करणार असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई चोपडा ग्रामीण निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, एएसआय किशोर शिंदे, हवालदार लक्ष्मण शिंगाणे, हवालदार भरत नाईक, कॉन्स्टेबल सुनील कोळी, कॉन्स्टेबल प्रमोद पारधी, कॉन्स्टेबल विशाल जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.