जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे काल रात्री उशीरा प्रर्यन्त नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून यात माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्यावर दुसरी महत्वाची जबाबदारी प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पक्षाची कार्यकारीणी जाहीर केली होती. यात राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांना उपनेतेपदी नियुक्त करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर पुन्हा एक नवीन जबाबदारी टाकण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे काल रात्री उशीरा नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात दीपक केसरकर हे मुख्य प्रवक्ते राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर प्रवक्त्यांच्या यादीत आ. गुलाबराव पाटील यांना स्थान देण्यात आले आहे. उर्वरित प्रवक्त्यांमध्ये माजी मंत्री आ. उदय सामंत, शीतल म्हात्रे यांचा समावेश आहे.