जळगाव महापालिकेसाठी पहिल्याच दिवशी तब्बल ‘इतक्या’ अर्जांची विक्री

डिसेंबर 23, 2025 10:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२५ । राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्रे) भरण्याच्या प्रक्रियेला आज २३ डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे. ३० डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून त्यामुळे आता महापालिकेच्या रणसंग्रमाला सुरुवात झालेली आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी जळगाव शहरातील सर्व १९ प्रभागांमधून तब्बल ७७७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एकाही उमेदवाराने प्रत्यक्ष अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे पहिला दिवस केवळ अर्ज खरेदी पुरताच मर्यादित राहिला.

jalgaon manapa (1)

उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होताच पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली. उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघा सात दिवसांचा कालावधी असल्याने अर्जात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी उमेदवारांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यास प्राधान्य दिले.

प्रत्यक्ष अर्ज दाखल झाले नसले, तरी इच्छुक उमेदवारांसह त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि उत्सुक नागरिकांची मोठी गर्दी महापालिका परिसरात जमली होती. त्यामुळे दिवसभर वातावरण गजबजलेले होते.

गर्दीमुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. महापालिकेच्या परिसरात पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे, परिसरात उत्साहासोबतच तणावाचे वातावरणही जाणवत होते. या सर्व परिस्थितीतही महापालिका प्रशासनाने सतर्कता बाळगत व्यवस्था सुरळीत ठेवली. दुसऱ्या मजल्यावर उपस्थित महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इच्छुकांना योग्य मार्गदर्शन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now