⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

सावळा गोंधळ : अधिकारी म्हणतात फवारणी झाली मात्र नगरसेवकांची नकारघंटा

जळगाव लाईव्ह न्युज । चिन्मय जगताप । पावसाळा सुरू होताच शहरात आजार डोकं वर काढू लागले. शहर मनपातील एक सावळा गोंधळ पुन्हा समोर येऊ लागला असून शहरातील फवारणीवरून नगरसेवक विरुद्ध मनपा अधिकारी असा वाद रंगणार आहे. अधिकारी शहरात फवारणी झाल्याचे सांगत असून नगरसेवक मात्र स्पष्ट नकार देत आहे.

जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक गल्लीमध्ये महानगर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी मच्छर मारण्यासाठी लागणाऱ्या रसायनाची फवारणी करण्यात आली असल्याची माहिती जळगाव लाईव्हला अधिकारी सुधीर सोनवाल यांनी दिली. ज्याचा पुरावा म्हणून आमच्याकडे सर्व नगरसेवकांचा स्वाक्षऱ्या आहेत असेही यावेळी ते म्हणाले. मात्र याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी, जर या क्षणापर्यंत आमच्या प्रभागात फवारणी झाली असेल तर त्या कर्मचाऱ्यांनी माझ्यासमोर येऊन ते सिद्ध करून दाखवावे, असे आवाहनच केले.

जिल्ह्यासह शहरात कोरोना नियंत्रित जरी होत असला तरी आत्ता सुरु झालेला पावसाळा, तुंबलेल्या गटारी आणि निकृष्ट रस्त्यांमुळे होत असलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे शहरातील नागरिकांना मच्छरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा थेट परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होत असून शहरात मलेरिया आणि डेंग्यची साथ पसरायला सुरुवात झाली आहे. यासाठी शहरात आतापर्यंत मच्छर मारण्याच्या औषधीची फवारणी कशा प्रकारे केली गेली आहे.
मनपा आरोग्य अधिकारी सुधीर सोनवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस दिवसात शहरातील एकोणीस प्रभागांमधील प्रत्येक गल्लीमध्ये अशा प्रकारच्या फवारण्या झाल्या आहेत. यामध्ये ९ लिटर २४० मिलिलिटर इतकी टेमीफॉस एबेट या मच्छर मारणाऱ्या औषधाची फवारणी करण्यात आली आहे. एकूण तीस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी बजावली आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, मनोज काळे यांच्यासह शहरातील नगरसेवक फवारणी झालीच नसल्याचे सांगत आहेत. दारकुंडे यांच्यासह इतर नगरसेवकांच्या मते आणि नागरिकांच्या मते शहरात कोणत्याही प्रकारची फवारणी करण्यात आलेली नाही.

पावसाआधी १९ एप्रिल रोजी मी आयुक्तांना पत्र लिहिले होते की, पावसाळा सुरू होत आहे व यासाठी शहरांमध्ये मच्छरांची फवारणी करण्याची नितांत गरज आहे. मात्र अजून शहरात किंवा माझ्या वॉर्डात एकदाही फवारणी झालेली नाही व त्या अधिकाऱ्यांनी माझ्या समोर उभा राहून सांगावं की माझ्या प्रभागात फवारणी झाली आहे, असे आवाहनच नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी दिले आहे.

शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही मच्छर मारण्याची फवारणी केली आहे. आणि केलेल्या कामासाठी आमच्याकडे नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत. अशी माहिती आरोग्य अधिकारी सुधीर सोनवाल यांनी दिली आहे.