जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । वडोदा वनक्षेत्रातील कुऱ्हा वनपरीमंडळातील राजुरा वनखंड १३५ मध्ये निलगाय मृतावस्थेत आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना २९ रोजी सकाळी उघडीच आली असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात या नील गायीचा मृत्यु झाला असावा. असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडुन वर्तविण्यात आला आहे. महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. यापुर्वी डोलारखेडा वनपरीमंडळातील सुकळी नियतक्षेत्रातील पायविहिरीत नीलगायीचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली होती.
वडोदा वनक्षेत्रार्गत कुऱ्हा वनपरीमंडळातील राजुरा नियतक्षेत्रात वनखंड क्र.१३५ मध्ये थेरोळा वनहद्दीत खारीच्या रस्त्याच्या लागुन नीलगायीचा मृतदेह असल्याचे आढळुन आले. घटनेचे वृत्त कळताच नवोदित वनपरीक्षेत्राधिकारी सचिन ठाकरे यांनी वनकर्मचाऱ्यांसह धाव घेतली. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अभय डुघ्रेकर यांना शवविच्छेदनासाठी पाचारण केले. डॉ अभय डुघ्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आश्विनी दाभाडे, डॉ जवरे यांनी घटनास्थळी मृत नीलगायीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर घटनास्थळी मृत नीलगायीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिस्र प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात नीलगायीचा जखमी होऊन मृत्यु झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे व डॉ. अश्विनी दाभाडे यांनी व्यक्त केला. प्रसंगी वनक्षेत्रपाल सचिन ठाकरेंसह कुऱ्हा वनपाल भावना मराठे, वनरक्षक ज्ञानोबा धुळगंडे, वनरक्षक राम असुरे, वनमजुर शुभम बोरसे,योगेश पाटील आदी उपस्थित होते. ऑगस्ट २०१८ मध्ये या शिवारातील पुर्णा नदीपात्रात पट्टेदार वाघाचा घातपाताने दुर्देवी मृत्यु झाल्याची घडली होती. तसेच महीनाभरापुर्वी सुकळी नियतक्षेत्रातील पायविहीरीत एका नीलगायीचा दुर्दैवी मृत्यु झाला होता.