जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२४ । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या राजकीय संन्यासाची मोठी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी मुक्ताईनगर मतदासंघांतील जनतेला भावनिक साद घातली आहे. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचे आवाहन केले.
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (शरद पवार) उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय जळगाव ग्रामीण, एरंडोल-पारोळा आणि जामनेरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. शरद पवार गटाच्या चारही मतदारसंघांवर लक्ष ठेवण्यासह तेथील उमेदवारांसाठी सभा घेण्याचा प्रयत्न एकनाथ खडसे यांनी केला. याशिवाय महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या उमेदवारांचा प्रचारही त्यांनी केला. तब्येतीच्या कारणावरून फार दगदग सहन होत नसल्याने पुढील निवडणूक मी पाहणार की नाही, ते परमेश्वर ठरवेल, असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. यापुढील काळात कोणतीच निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी केले.
https://twitter.com/Rohini_khadse/status/1858387208908243303खडसे यांनी जवळपास चार दशके जळगाव जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील राजकारण गाजवले. सभागृहातील त्यांची भाषणे प्रचंड गाजली होती. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, मी नाथाभाऊ बोलत आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. यापुढे मी निवडणूक लढवणार नाही. मी गेली अनेक वर्षे आपल्या सोबत आहे. गेली अनेक वर्षे आपण सर्वांनी मला सहकार्य केले आहे. कधी जात-धर्म न पाहता सर्वांना मदत केली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे मी पुढची निवडणूक पाहणार की नाही, हे ईश्वरच ठरवेल. परंतु आपण मला जसे सहकार्य केले, तसे सहकार्य रोहिणी खडसे यांना करावे आणि निवडून आणावे, असे भावनिक आवाहन एकनाथ खडसे यांनी केले. यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ एकनाथ खडसे यांनी शेअर केला.